Tuesday 4 August 2020

सात दिवसात सात पुस्तके यशस्वीरित्या वाचून पूर्ण केल्या नंतर मिळालेले धडे.

काही दिवसांपूर्वी एका माजी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाखती दरम्यान, ३६५ दिवसात ३६५ पुस्तके वाचली असल्याचे त्याने म्हंटलेले मी ऐकले अन थोडा साशंक झालो. वाचनाची तशी आवड तर आहे मला मात्र आजतागायत काही मोजकीच पुस्तके मी वाचून पूर्ण केली होती, अन तेही एका पुस्तकासाठी एक ते दोन महिन्या वेळ घेत त्यामुळे दर दिवशी एक संपूर्ण पुस्तक वाचणं कसं शक्य आहे असा साहजिक प्रश्न पडला? कित्येकदा  मी आठवड्या भरात एक पुस्तक वाचण्याचा निर्धार करतो आणि तोच निर्धार त्याच पुस्तका साठी दुसऱ्या आठवड्यात हि नव्याने करावा लागतो. रोजच्या दैनंदिन कामकाजात वेळ कसा अगदी भुर्रर्रकन निघून जातो हे रात्र झाल्याशिवाय लक्ष्यात हि येत नाही अन आठवडा संपून नवीन आठवडा सुरु होतो.
ह्या वेळेस मात्र एकदा स्वतःहून हे आव्हाहन स्वतःला देण्याचा निर्णय घेतला अन म्हंटले पाहुयात तरी जमतंय काय, वाचूयात एका दिवसात एक पुस्तक अन आठवड्या भरात सात. २३ जुलै ला पहिले पुस्तक हातात घेतले अन २९ जुलै ला सातवे पुस्तक पूर्ण केले. ह्या सात दिवसाच्या प्रवासात मनाच्या अंतर्भूत क्षमतांची नव्याने जाणीव झाली, हा प्रवास एक उत्कृष्ठ अनुभव होता, त्यातून मिळालेली शिकवण आपल्या सोबत सामायिक करताना आनंद होत आहे.

१. वेळेची कमतरता

प्रत्येकाला जरी रोज चे २४ तास मिळालेले असले तरी प्रत्येकाने मिळवलेल्या यशाची व्याप्ती हि वेगळी असते, आपली स्वप्न आणि ध्येये पूर्ण करायची असल्यास प्रत्येक मिनिटाचा त्या कार्यासाठी वापर करणे हि महत्वाची बाब लक्ष्यात आली. माझ्या २४ तासांतील ८ समर्पित तास नोकरीचे अन ६ तास झोपेचे असे १४ तास संपूर्ण वगळून उरलेल्या १० तासांचं गणीत बसवण्याचं मी ठरवलं. ठरवलेल्या पुस्तकांची पृष्ठ संख्या ३००, १२३, २८६, १२७, १०६, २२३,२३६ अशी असल्याने रोजची जवळपास २०० पाने वाचावी लागणार होती, त्यातही एखाद्या पुस्तकाची जास्त पाने असल्यास ते २४ तासांच्या आताच पूर्ण करावयाचे ठरवले.
विषय समजून घेऊन वाचल्यास अन नोट्स काढण्याचीही सवय असल्याने प्रतिपानि मला १.५ ते २ मिनिटे लागतात हे लक्ष्यात आहे. त्यानुसार रोजचे ४ ते ६ तास समर्पित करावे लागणार होते कधी जास्त तर कधी कमी. वाचनास
सुरुवात करण्या आधी असे वाटले कि हे आव्हान म्हणजे अगदी तारेवरची कसरत असणार आहे, मात्र प्रत्यक्षात आलेला अनुभव काही वेगळाच होता, आप्तेष्ठां सोबत वेळ घालवणे, रोजचा व्यायाम करणे, ध्यान आणि योग करणे, नोकरीतील कामे करणे, मित्रांबरोबर बोलणे, इंटरनेट वर वेळ घालवणे, अश्या अनेक रोजच्या कामांचा त्याग करण्याची गरजच लागली नाही. फक्त वायफळ घालवलेला वेळ सत्कारणी लावला, आपल्याकडे खूप वेळ असतो हे या दरम्यान लक्ष्यात आले, अन "वेळ नाहीये" हा फक्त मनाने स्वतः साठी गुंफलेला एक आभास असल्याचे जाणवले, प्रत्यक्षात आपल्याकडे ऊर्जा नसते किंवा इच्छा नसते, त्यामुळे वेळेचं नियोजन होत नाही, तांत्रिक दृष्ट्या वेळ नसणे हा फार क्वचित घडणार प्रकार आहे, असं दररोज नक्कीच होत नाही.

२. इच्छेची तीव्रता

आपले मन नेहमी आपल्याला आरामदायक अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे एखादे जाड पुस्तक पहिल्या बरोबर मनात ते न वाचण्याची अनेक कारणे समोर येऊ लागतात आणि ती कारणे महत्वाची असून पुस्तक वाचण्यात वेळ घालवू नये हे एकदा का पक्के केले कि थोड्याच वेळात ती कारणे हि विस्मृतीत जातात आणि स्वतः ला पुस्तका पासून दूर ठेवण्याच्या मनाच्या डावपेचाचा विजय होतो. अगदी अश्याच निर्णायक क्षणी आपल्या इच्छा शक्तीला काही काळ रोखून धरून लहानशी सुरुवात केल्यास, जसे, फक्त एखादे पान वाचल्यास, कदाचित मनाला हे काम सोपं वाटूलागेल कारण रोज एखाद पान वाचणं काही अवघड नाहीये, मग हळू हळू विषया बद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची इच्छा आणि आपली जिज्ञासा पुढचा प्रवास सोपा करेल, माघार घेण्यापेक्षा लहानशी कृती सुरु करणे ही यशाची  गुरुकिल्ली आहे आणि सतत अशी पुनरावृत्ती केल्यास तिचे सवयीमध्ये रूपांतरण होऊ शकेल.

३. प्राधान्य क्रम


वेळेचं नियोजन म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवनाच नियोजन. उर्वरित १० तासांमध्ये दैनंदिन कामे आणि ४-६ तास वाचन यांचा व्यवस्थित नियोजन करताना ४० मिनिटांचे ७ ते १० संच तय्यार केलेत, सकाळी १० वाजेच्या आधी २-३ तास आणि सायंकाळी ७ नंतर २ ते ३ तास वाचनाला प्राधान्य देत  ह्या वेळेत सगळे 
 ४० मिनिटांचे संच पूर्ण केलेत. नेमकं ह्याच काही तासांमध्ये आपण बऱ्याचदा आपला वेळ कमी महत्वाच्या अथवा फक्त मनोरंजनात्मक गोष्टीं वर खर्च करतो, हा वेळ आपण आपल्याला आयुष्याला उभारणी देणाऱ्या कार्यासाठी वापरू शकतो हे जाणवले. करमणुकेचे जीवनात महत्व तर आहेच मात्र स्वतःला घडवण्याचा उद्धेश आपण बाळगून असाल तर हा वेळ आपण नवीन काहीतरी शिकण्यासाठी वापरू शकतो.

४. चिकाटी

सतत वाहणारी नदी आणि तिच्या सततच्या प्रवाहाने दुभंगलेले पर्वत, चिकाटीचे ह्या पेक्षा छान उदाहरण नाही. सुनियोजनाला सातत्याची साथ लाभल्यास जवळपास अशक्य असे काहीच नाही. नैसर्गिकरित्या आपले मन कोणत्याही गोष्टीवर जास्त वेळ केंद्रित राहू शकत नाही दर ६-७ सेकंदां नंतर ते इतरत्र पळू लागते, अश्या वेळेस जिद्दीची लगाम घालून मनाला स्वयं शिस्तीचा धडा शिकवावा, अश्या अनेक आवर्तनांनंतर आपोआपच मनाला एकाग्रतेची सवय लागेल. जिद्धीचा उगम उत्स्फूर्त प्रेरणेतून होतो, प्रेरणा हि ध्येयाच्या स्पष्टते मुळे मिळते म्हणूनच  अंतः  प्रेरणेनमुळे सुस्पष्ट ध्येय जिद्दीच्या जोरावर गाठणे शक्य होते.
जास्तीत जास्त वेळ लक्ष्य केंद्रित ठेवू शकण्याच्या गुणांवर प्रत्येकाने काम करायला हवे, कारण एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे.

आपल्यातल्या पूर्ण क्षमतांची जाणीव कदाचित आपल्याला योगायोगानेच होते, मात्र त्याकरिता आपण उत्साही असायला हवे, प्रत्येकात अमर्याद क्षमता असून त्याची जाणीव व्यक्तिपरत्वे कमी अधिक प्रमाणात असते कधी ती अनुभवातून होत असते तर कधी ती आपोआपच होऊन जाते, ह्या क्षमतांना जाणून घेऊन अधिकाधिक विकास  करणे आणि आपल्या जीवन उर्जेला शक्ती प्रदान करणे हे मात्र आपल्या हाती आहे.


No comments:

Post a Comment

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...