Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Saturday, 15 January 2022

संदर्भ


संदर्भ लागल्या शिवाय आपल्याला गोष्टींची उकल होणे जरा अवघडच. अचानक कुणीतरी व्यक्ती आपल्याला रस्त्यावर भेटते, आपल्याशी बोलते मात्र ती व्यक्ती या आधी आपल्याला नेमकी कोठे भेटली होती याचा संदर्भ कधी कधी आपल्याला सापडत नाही. अन खूप विचार केल्यानंतर अचानक आठवते कि कोणत्यातरी कार्यक्रमा दरम्यान तुमची भेट त्या व्यक्तीशी झाली होती, म्हणजेच संदर्भ सापडतो.

संदर्भ म्हणजेच भूतकाळातील माहितीचे संकलन होय. मनाच्या भल्यामोठ्या कोठारात अनेक प्रसंग माहिती स्वरूपात साठवून ठेवले जातात तेही बऱ्याचदा आपल्या नकळतच. पुढे ह्याच माहितीच्या आधारे आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू नकळतच घडत जातात. म्हणूनच भारतीय संस्कृतीत पूर्वीपासून संस्कारांना अत्यंत महत्व दिले जाते. मुलं लहान असल्यापासून त्याच्या मनावर सुसंस्कार व्हावेत याकरिता अनेक परंपरा निर्माण केल्या गेल्यात. काही अपवाद वगळता, हल्ली अश्या स्वरूपाची कोणतीही सक्षम व्यवस्था दिसून येत नाही त्यामुळे व्यक्ती लहानपणा पासूनच तंत्रज्ञानाच्या ह्या युगातील माहितीच्या महासागरातून मिळेल ती माहिती संकलित करून त्याचा संदर्भ म्हणून भावी आयुष्यात वापर करते. त्यामुळे तरुण पिढी आजकाल थोडी स्वैर वागु लागत असेल तरी वावगे वाटू नये. कुटुंब संस्थेतहि सुसंस्कारांच्या परंपरांची व्यवस्था लोप पावल्यामुळे पुढे सामाजिक आणि राष्ट्रीय स्थरावर तिचे अस्तित्व धूसर होऊ लागले आहे. त्यामुळे अश्या उपलब्ध माहितीचा स्वयं संचित संदर्भ व्यक्तीच्या आयुष्यात दूरगामी परिणाम करीत असल्यामुळे कधी कधी उपलब्ध माहितीचा आधार जर भ्रम असेल तर व्यक्ती दिशाहीन होण्याची शक्यताच जास्त. आणि त्याहून कठीण परिस्थिती हि असेल कि दिशाहीन असूनही मार्गस्थ असल्याचा भ्रम मात्र सतत या व्यक्तीला होत राहील.

वरील बाब दृष्टी भ्रमाच्या उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूयात,

वरील चित्रात दिसणाऱ्या 'A' आणि 'B' या दोन्ही चौरसांचा रंग कोणता असे विचारल्यास, काळा आणि पांढरा असे उत्तर अनेकांकडून मिळते. प्रत्यक्षात मात्र ह्या दोन्ही चौरसांचा रंग अगदी एकसारखाच आहे. मात्र यावर मन विश्वास ठेवायला तयार होत नाही कारण त्या दोन्ही चौरसांना आपण त्याच्या शेजारील चौरसाच्या संदर्भातून पाहत असतो. शेजारील चौरसां कडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे आपण स्पष्ट अगदी स्पष्ट पणे काळा किंवा पांढरा हे अगदी परस्पर विरोधी रंग पाहतो, तेही एकसारख्या असणाऱ्या चौरसांमधूनच.

आपल्या मनात सर्व ज्ञानेंद्रियांमार्फत जी माहिती एकत्रित केली गेली आहे ती अश्याच संदर्भांचं काम करीत असते आणि आपल्या मानसिक विचारसरणीला आणि व्यक्तिमत्वाला काळ्या किंवा पांढऱ्या स्वरूपात उभारणी देत असते. संदर्भांच्या अभेद्य भिंतींना भेदून जीवनाकडे स्पष्ट पणे पाहता यावं या करीत आपण सर्वानी प्रयत्न करायला हवा. आपल्या व्यक्तिमत्वाचे, जातीधर्माचे, सामाजिक आणि आर्थिक असे अनेक भ्रमित करणारे संदर्भ मनात खोलवर रुजले जातात आणि त्या पलीकडे पाहणे अवघड होऊन बसते. स्वतः च्या क्षमतांच्या बाबतीत, इतर व्यक्तीच्या अथवा गोष्टींच्या बाबतीत भूतकाळातील संदर्भ हाच एकमात्र संपूर्ण आधार न मानता तटस्थ राहून अनुमान लावल्यास बाबी अधिक स्पष्टपणे दिसू लागतील. तसेच मनाच्या गाभाऱ्यात साठलेल्या संदर्भांना एकदा तपासून हि घ्यावे कदाचित भ्रमाचा घट्ट पगडा दूर होऊ शकेल आणि जीवनाला नव्याने आणि अधिक स्पष्ठतेणे पाहता येऊ शकेल आणि या आधी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी हि तुम्ही नव्याने शक्य करू शकाल अन स्वतः कडे पाहण्याचा तुमचा संदर्भ च बदलेल.



Wednesday, 18 August 2021

प्राचीन विज्ञान: भाग एक.


प्राचीन विज्ञान

विद पासून उगम पावलेल्या वेद शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान असाच आहे जसा scientia ह्या लॅटिन शब्दापासून तय्यार झालेल्या सायन्स शब्दाचा आहे. मात्र वेदांची शात्रोक्त बांधणी आधुनिक विज्ञानाच्या उगमाच्या हजारो वर्षां पूर्वी च झाली होती. आधुनिक विज्ञान आणि पौर्वात्य आत्मिक ज्ञान हे परस्पर विरोधी मानावेत कि एकाच वृक्षाच्या दोन फांद्या म्हणाव्यात. एकाला तार्किक चौकटीतून तर दुसऱ्याला तर्कविसंगतीतून पाहावे काय? याविषयी उहापोह पुढील लेखांमध्ये आपण करूच. किंबहुना ती काळाची गरजच आहे म्हणा. भौतिक शास्त्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ नील्स बोहर, ताओ ऑफ फिज़िक्स (१९७५) या पुस्तकात, “I go to the Upanishad to ask questions.” असे का म्हणतो याचे उत्तर शोधावेच लागेल. प्राचीन विज्ञान लेखांच्या मालिकेच्या माध्यमातून अश्याच काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

भारतीय संस्कृतीचा मूलाधार मानल्या गेलेल्या वेदांच्या रचनेमागिल कारण थोडक्यात पाहुयात, म्हणजे पुढील अभ्यास सोपा ठरेल. वेद शब्दापासून विद्या म्हणजेच अर्जित ज्ञान, आणि ज्ञानार्जन केलेला व्यक्ती विद्वान असे शब्द रचले गेलेत. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आजच्या काळातील कोणतेही अद्ययावत भौतिक उपकरण अस्तित्वात नव्हते. तेव्हाही मानवाला अनेक प्रश्न पडत असत. मात्र Google  करून उत्तर शोधणे शक्य नसल्यामुळे जीवनाशी संबंधित प्रश्नांची उकल करण्यासाठी तो स्वतः प्रयत्न करीत आणि अतोनात प्रयत्न करून त्याला जे ज्ञान प्राप्त होई ते आत्मिक ज्ञानावर आधारित असे. म्हणजेच जाणिवेच्या माध्यमातून प्रत्यक्ष आकलन केलेले. पुढील पिढीला हे प्राप्त ज्ञान द्यायचे असल्यास तेही प्रत्यक्ष जाणिवेच्या माध्यमातूनच दिले जाई, कोणत्याही प्रकारे निव्वळ विश्वास न ठेवता.

प्रत्येक विषयावर हजारो प्रश्न उपस्थित करून जो पर्यंत समाधानपूर्वक उत्तर मिळत नाही तो पर्यंत कोणतेही सांगितले गेलेलं ज्ञान अर्जित केले जात नसे. जगात क्वचितच कोठे अश्या प्रकारे शिक्षण देण्याची प्रथा असावी.

भारतीय भूमीवर जन्मलेली कोणतीही संकल्पना किंवा तत्वज्ञान अस्तित्ववादाच्या प्रखर परीक्षेतून गेल्यावरच मान्य होत असे. निव्वळ परिकल्पना म्हणून नव्हे. कदाचित पुढे आत्मज्ञानाने प्राप्त झालेले कल्याणकारी आत्मसाक्षात्कार सामान्यांना समजण्यास सोपे आणि सुलभ व्हावेत म्हणून प्रतीके आणि गोष्टी च्या स्वरूप सांगितले जाऊ लागले. वेळ आणि अवकाशाचा अल्बर्ट आईन्स्टाईन चा सापेक्षता वादाचा सिद्धांत सुद्धा सामान्यांना गोष्टीरूपात सांगावा लागतो तसेच काहीसे. साक्षात्कारातून साकारलेली आणि मानवोपयोगी शिकवण दीर्घकाळ टिकून राहावी याकरिता प्रथा आणि परंपरा निर्माण केल्या गेल्यात, परंपरा निर्माण होण्यामागील विज्ञान हेच आहे कि, कल्याणकारी गोष्ट परंपरेच्या  स्वरूपात अधिकाधिक पिढ्यांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. ह्याच परंपरांचा संग्रह म्हणजे आधुनिक भाषेततिल धर्माची संकल्पना गणले गेले. मानवी मन स्थिर नसल्याने पुढील काही काळात त्या परंपरांमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी समाविष्ट होत गेल्या. मात्र सामाजिक दृष्ट्या लाभकारी असलेल्या कित्येक सर्वसमावेशक आणि कल्याणकारी परंपरा आजही तग धरून. प्राचीन विज्ञान ग्रहण करण्या करीता गरजेची असलेली गुरुशिष्य परंपरा गेल्या ३०० वर्षांत लुप्त होत गेल्यामुळे, जमेल तसा अर्थ देऊन हे ज्ञान पुढे ढकलण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो, त्यामुळे आधुनिक तर्कसंगत पिढीद्वारे अश्या गोष्टीना भ्रामक मानून त्या हळू हळू दुर्लक्षित केल्या जाऊ लागल्यात.


तर्कसंगत बुद्धी तुमच्या बाह्य प्रगतीकरिता आणि टिकून राहण्याच्या कामात मोलाचे योगदान देते, मात्र अस्तित्वाविषयी जाणून घेण्याच्या प्रयत्नात तर्क अपुरा पडतो. एबीओजेनेसिस ह्या पृथीवरील जीवनाच्या उगमाचा शोध घेणाऱ्या विज्ञानाच्या शाखेमध्ये जीवनाचे उगम स्थान शोधताना सगळे तर्क अपुरे पडून निव्वळ एक जादुई योगायोग म्हणून पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात मानवी लागते. कृष्ण विवर, डार्क energy डार्क मॅटर, ऑबसर्वर पॅराडॉक्स, quantum एंटॅगलमेंट सारख्या आधुनिक विज्ञानाला सतावणाऱ्या अनेक प्रश्नांपुढे तर्कबुद्धी गुढगे टेकते. कारण सर्वत्र प्रस्थापित भौतिक नियम येथे लागू होत नाहीत. मग तर्क विसंगती म्हणजे अज्ञान असे म्हणून ह्या किचकट गणितांना सोडून द्यावे काय? अगदी जसे काही आत्मज्ञानावर आधारित आणि कल्याणकारी परंपरांना अज्ञानी म्हणून हिणवत सोडून दिले गेले? नाही. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आज उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या आधाराव सापडत नसेल तर कदाचित पुढे ज्ञान संवर्धन झाल्यास सापडू शकेल, उदाहरणादाखल. भारतीय संस्कृतीमध्ये ठरावीक वेळेनंतर संपूर्ण उपवास करण्याची प्रथा सामील आहे. हि प्रथा कुणी आणि का सुरु केली असावी याचा काही पुरावा नाही, मात्र कुठेतरी लाभकारी असल्यामुळे ती अजूनही तग धरून आहे. आधुनिक या नावाचे बिरुद मिरवणाऱ्या काहींनी कित्त्येक वर्षे उपवासाची खिल्ली उडवली मात्र एक आधुनिक जपानी cell biologist Yoshinori Ohsumi यांनी २०१६ सालचे नोबेल पारितोषिक उपवास का करावा हे सांगूनच जिंकले. या संदर्भात Intermediate  fasting च्या नावाने बरीचशी माहिती आज इंटरनेट वर उपलब्ध आहे आपण स्वतः च या संदर्भात माहिती मिळवावी आणि संपूर्ण शोध निबंध आणि भारतीय संस्कृतीचा भाग असलेला उपवास या दोन्हींचा 

 अभ्यास करून यांच्यात काही साधर्म्य आहे काय पडताळून पाहावे. एक ना अनेक गोष्टी ज्या आज तुमच्या ज्ञानानुसार कोणत्याही तार्किक चौकटीत बसूशकणार नाहीत मात्र कल्याणकारी आहे, या संस्कृतीने जपलेल्या आहेत, मात्र याची जाणीव होण्याकरिता 

कोणीतरी पाश्चिमात्याने ती तुम्हाला सांगावी लागेल. कारण भारतीय संस्कृती कशी तर्क विसंगत आहे याचा साचेबंद गेल्या दोनशे वर्षांत आपल्या बुद्धीवर साचलेला आहे. मात्र एकी गोष्ट ध्यानी असुदे, कोणतीही गोष्ट 

अभ्यासल्या शिवाय त्याविषयी मत बनवणे हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे, आधुनिक संस्कृती असो किंवा प्राचीन संस्कृती असो अंधश्रद्धेला भारतीय भूमीवर थारा नाही. पुढील लेखात आपण अश्याच काही निवडक संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत.

Wednesday, 4 August 2021

प्रत्येक क्षण महत्वाचा.

चुकांमधून शिकता येते हि गोष्ट कळायला लागली कि बऱ्याचदा आयुष्य सोपे वाटू लागते. कधीकधी लहान 

गोष्टीसुद्धा  मोठा बोध देऊन जातात. जसे बुद्धिबळाचा खेळ, बुद्धिबळाच्या खेळातून शिकण्यासारख्या तश्या असंख्य गोष्टी आहेत. एक सामना गमावल्यानंतर अशीच एक शिकवण माझ्याही पदरी पडली.

मी निष्णात खेळाडू नाही, मात्र कधी कधी बुद्धिबळ खेळणे मला आवडते. एके सायंकाळी ऑनलाईन पद्धतीने खेळत असताना खेळ रंगात आला अन चाल प्रतिचाल करीत एकमेकांना पराभूत करण्यासाठी मी आणि माझा प्रतिस्पर्धी एकाग्र होऊन खेळू लागलो. खेळाला वेळेची मर्यादा असल्याने कमीत कमी वेळेत योग्य निर्णय घेऊन उपलब्ध सोंगट्यांची उपयुक्त मांडणी करणे आवश्यक असते. त्यामुळे बुद्धिबळातील बुलेट प्रकारच्या खेळात फक्त एका मिनिटाच्या वेळेत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नांना एक वेगळाच थरार प्राप्त होतो. प्रयत्न करून हि हा सामना मी ०.००.१ मिनिटे म्हणजेच एका सेकंदाच्या सहाव्या भागाच्या फरकाने गमावला.

 सामना संपल्यावर विचारचक्र सुरू झाले. अनेक प्रसंगात आपल्याजवळ खूप वेळ असूनदेखील योग्य  नियोजन करायला आपण फार वेळ लावतो तसेच जिथे लवकर निर्णय घेता येतील अश्या प्रसंगातही गरज नसताना आपण 

खूप विचार करत बसतो. वेळ मात्र सतत निसटून जात असतो...

प्रत्येक क्षणाचे महत्व ओळखून त्याचे नियोजन आणि लवकर अचूक निर्णय घेण्याची क्षमताच आपल्याला जिंकावत असते, आयुष्यातही. कौशल्य असूनदेखील वेळेचे महत्व न ओळखल्यास आणि निर्णय घेण्यास दिरंगाई करीत बसल्यास काही उपयोग होत नाही. जसे वर नमूद केलेल्या खेळात माझ्या प्रतिस्पर्ध्याने फक्त काही मिलिसेकंद कमी घेतलेत आणि तो जिंकू शकला. प्रत्येक क्षण महत्वाचा असून त्याचे महत्व मात्र आपल्याला त्या क्षणी जाणवत नाही आणि हाच अजाणतेपणा वेळेचा सदुपयोग करण्याच्या कामातील सर्वात मोठा अडसर ठरतो. 

वेळेचे महत्व वेळीच ओळखावे त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी नक्कीच मदत होईल.

चुकांमधून शिकता येते हि गोष्ट कळायला लागली कि बऱ्याचदा आयुष्य सोपे वाटू लागते. कधीकधी लहान 

गोष्टीसुद्धा  मोठा बोध देऊन जातात. जसे बुद्धिबळाचा खेळ, बुद्धिबळाच्या खेळातून शिकण्यासारख्या तश्या असंख्य गोष्टी आहेत. एक सामना गमावल्यानंतर अशीच एक शिकवण माझ्याही पदरी पडली.

मी निष्णात खेळाडू नाही, मात्र कधी कधी बुद्धिबळ खेळणे मला आवडते. एके सायंकाळी ऑनलाईन पद्धतीने खेळत असताना खेळ रंगात आला अन चाल प्रतिचाल करीत एकमेकांना पराभूत करण्यासाठी मी आणि माझा प्रतिस्पर्धी एकाग्र होऊन खेळू लागलो. खेळाला वेळेची मर्यादा असल्याने कमीत कमी वेळेत योग्य निर्णय घेऊन उपलब्ध सोंगट्यांची उपयुक्त मांडणी करणे आवश्यक असते. त्यामुळे बुद्धिबळातील बुलेट प्रकारच्या खेळात फक्त एका मिनिटाच्या वेळेत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नांना एक वेगळाच थरार प्राप्त होतो. प्रयत्न करून हि हा सामना मी ०.००.१ मिनिटे म्हणजेच एका सेकंदाच्या सहाव्या भागाच्या फरकाने गमावला.

 सामना संपल्यावर विचारचक्र सुरू झाले. अनेक प्रसंगात आपल्याजवळ खूप वेळ असूनदेखील योग्य  नियोजन करायला आपण फार वेळ लावतो तसेच जिथे लवकर निर्णय घेता येतील अश्या प्रसंगातही गरज नसताना आपण 

खूप विचार करत बसतो. वेळ मात्र सतत निसटून जात असतो...

प्रत्येक क्षणाचे महत्व ओळखून त्याचे नियोजन आणि लवकर अचूक निर्णय घेण्याची क्षमताच आपल्याला जिंकावत असते, आयुष्यातही. कौशल्य असूनदेखील वेळेचे महत्व न ओळखल्यास आणि निर्णय घेण्यास दिरंगाई करीत बसल्यास काही उपयोग होत नाही. जसे वर नमूद केलेल्या खेळात माझ्या प्रतिस्पर्ध्याने फक्त काही मिलिसेकंद कमी घेतलेत आणि तो जिंकू शकला. प्रत्येक क्षण महत्वाचा असून त्याचे महत्व मात्र आपल्याला त्या क्षणी जाणवत नाही आणि हाच अजाणतेपणा वेळेचा सदुपयोग करण्याच्या कामातील सर्वात मोठा अडसर ठरतो. 

वेळेचे महत्व वेळीच ओळखावे त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी नक्कीच मदत होईल.

Wednesday, 28 July 2021

अनंतातून शुन्याकडे: भाग ३ : सृष्टीशी एकरूपता

 


पर्यावरण किंवा निसर्ग हा आपल्या पासून वेगळा आहे असे समजण्याची चूक आपण करतो आणि मानवाकडून होणार निसर्गाचा ऱ्हास कसा कमी करता येईल याविषयी कल्पना करू लागतो.
हे संबंध विश्व एकच निसर्ग असून अस्तित्वात असलेली प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्ट एकमेकांना प्रभावित करीत निसर्गाची लय टिकवून ठेवीत असते. मग सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधील गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने प्राप्त झालेली स्थिरता असो किंवा एखाद्या मधमाशीकडून अजाणतेपणे होणारे हजारो परागकणांचे रोपण ज्यातून आजवर लक्षावधी वृक्षांची जंगले उभी राहिलीत.

माणूस या सर्व नैसर्गिक व्यवस्थे मध्ये कोणत्यातरी कोपऱ्यातील एक घटक आहे. नैसर्गिक व्यवस्थेला चालवणाऱ्या साखळी मध्ये आपण सर्वोच्च स्थानी नसून, फक्त चैतन्य प्राप्तीच्या बाबतीत सुदैवी ठरलो. इतर सजीव आणि निर्जीव सृष्टीशी तुलना करता मानवाला होणार चेतनेचा बोध सर्वोच्च आहे. त्या अर्थी, मानवाने समस्थ सृष्टीच्या संचलनात मोलाचे योगदान देऊन प्रस्थापित निसर्ग व्यवस्था वृद्धिंगत करणे अपेक्षित आहे.
प्राप्त बुद्धीमुळे स्वतःला सर्वेसर्वा समजण्याची घोडचूक आपण करीत आहोत आणि आपल्या अस्तित्वाचा आधार असलेल्या निसर्गाला आपल्यापासून वेगळे समजून केवळ आणि केवळ आपल्या षड्रिपूंवर आधारित गरजा पूर्ण करण्याच्या लालसेपोटी निसर्गरूपी वृक्षाच्या मुळावर घाव घालीत असून ह्याच वटवृक्षावर आपले देखील घरटे आहे हे आपण पुरते विसरत चाललेलो आहोत.

पुराणकाळात उदयाला आलेल्या कोणत्याही संस्कृतीची बीजे निसर्गावर असलेले मानवाचे अवलंबित्व ओळखून निसर्गाचा आदर करण्यात सापडतात. मात्र गेल्या काही शतकांमध्ये अचानक उदयाला आलेली आधुनिक संस्कृती निसर्गापासून तुटत चालली असून केवळ अज्ञानामुळे आपण निसर्गाच्या शक्तीला दुर्लक्षित करत आहोत. अद्ययावत उपकरणे म्हणजेच मानवजातीचा आधार असे काहीसे मत तरुणांमध्ये तयार होताना दिसून येते. मात्र मानवासारखे उत्कृष्ट उपकरण बनवणाऱ्या निसर्गाच्या किमयेला दुर्लक्षित करून कसे चालेल.
अगदी अणुच्या घडणी पासून ते मानवीय चेतनेचा विकास करण्यापर्यंत निसर्गाने सूक्ष्म गोष्टींमध्ये देखील गफलत केलेली नाहीये. जैविकअभियांत्रिकीचा महासंचालक निसर्ग आपण रोजच्या व्यवहारात ध्यानात सुद्धा घेत नाही हे नवलंच. शे दोनशे वर्षांपूर्वी पर्यंत मात्र भारतीय आणि इतर काही संस्कृतीतील लोक निसर्ग शक्तींच्या प्रति आदरभाव व्यक्त करीत दिवसाची सुरुवात आणि शेवट करत असत. आणि आज हा आदरभाव व्यक्त करणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण असे समजणारा अतिहुशार समाज अस्तित्वात येताना दिसतोय.
विश्वोत्पत्ती आणि उत्क्रांतीच्या महायज्ञातून निघालेला एक सूक्ष्म घटक म्हणजे मानव. मानवाचे अस्तित्व टिकून राहण्या करीत साहाय्य करणारे अब्जावधी इतर सजीव आणि निर्जीव घटक आपल्या नकळत मात्र अविरतपणे कार्य करीत आहेत, आणि जो पर्यंत त्यांच्या कार्यात काही अडथळा येत नाही तो पर्यंत याची जाणीवदेखील आपल्याला होत नसते.
मागील सत्रात पहिल्या प्रमाणे आपल्याला मोफत मिळणारा प्राणवायू लक्षावधी वर्षांपूर्वी एकदिवसाचे आयुष्य जगून सायनो बॅक्टरीया ह्या एकपेशीय जिवाने वातावरणात आणून आपल्याला देणगी दिली. पृथ्वीच्या शिलावरणातील खनिजे आणि मूलद्रव्ये खेचून घेऊन तुम्हाला प्राप्त असलेले सुदृढ आणि सुडौल शरीर बनवण्याकरिता हजारो वनस्पती आपले जीवन व्यतीत करीत आहेत. आपण ज्या दिशेला पाहू त्यादिशेला आपल्या अस्तित्वासाठी कारणीभूत तत्वे आणि घटना सापडतील, ज्यांचा रचयिता सर्वशक्तिमान निसर्ग शिवाय दुसरा कुणी नाही.
प्रदूषण कमी करावे, झाडे लावा, पाणी वाचवा यानं सारख्या घोषणा देऊन काही निद्रितावस्थेतील लोकांना जागृत करण्याची मुळात गरजच का भासावी अज्ञानाने शिखर का गाठावे?
सर्वोच्च बुद्धिमत्ता लाभलेल्या मानवाला स्वतः ची मूलभूत गरज कोणती याची स्वतंत्र्य जाणीव का करून द्यावी लागावी? याचे उत्तर एकाच, आधुनिकीकरणाच्या नावाखाली तयार झालेली ज्ञानी असल्याचा आभास घडवणारी अज्ञानी वृत्तीची होत असलेली जोपासना. ज्या वृत्तीचे मूळ कारण भोगीवादाचा काही अंशी केलेला स्वीकार होय. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास भोगीवाद म्हणजे पंचेंद्रियांच्या तृप्तीची सतत वाढ करीत राहणे होय.
येथे आधुनिकीकरणाला किंवा तांत्रिक प्रगतीला विरोध नाहीये, मात्र जीवन अधिकाधिक आरामदायी करण्याच्या मानसिकतेला बदलणे आवश्यक वाटते, जीवन अधिकाधिक सुव्यवस्थित आणि तांत्रिक दृष्ट्या प्रगत असणे मानवासाठी सुखकर आणि काही वेळेस गरजेचे सुद्धा आहे यात कोणतीही शंका नाही. मात्र हे सर्व निसर्गाचा ऱ्हास करून प्राप्त करावे हे मात्र स्वतः च्या विरोधात एक दीर्घ कारस्थान करण्यासारखेच म्हणावे लागेल. ज्याचे परिणाम कालांतराने दिसू लागतील किंबहुना जगातील मुख्य शहरांतील खालावलेली भूजल पातळी आणि महासागराची वाढणारी पाण्याची पातळी याचे प्रमाण देऊ लागली आहे. आपण कोठे जात आहोत याची जाणीव आपल्याला झालेली आहे आणि आंतरराष्टीय स्थरावर हा परिणाम कमी करण्यासाठी काही प्रयत्न झालेले हि दिसून येतात. मात्र सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था वेळेत यशस्वी होणे अवघडच. अर्थव्यवस्थेने प्रभावित किंवा ग्रसित आंतरराष्ट्रीय व्यवहार थांबवणे इतके सोपे नसून, या संस्थांचा वातावरणातील कार्बन नियंत्रित करण्याचा प्रयत्न निव्वळ गोगलगाय असून त्यामुळे वातावरणीय बदलाच्या वादळी वेगाला थोपवणे महाकठीण. या कामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थानि केलेले प्रयत्न अपुरेच राहतील, कायम, जो पर्यंत तुमचा सक्रिय सहभाग यात नाही. सक्रिय सहभाग न होण्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाशी आपले तुटत चाललेले नाते. सर्वप्रथम निसर्गाशी पुन्हा नाते जोडणे आवश्यक आहे. किमान १० पैकी ८ जणांना खरीखुरी जाणीव व्हावी लागेल कि शुद्ध हवा हि वायफाय पेक्षा जास्त महत्वाची आहे तसेच आपले आरोग्य, आर्थिक प्रगती, सामाजिक शांतता ह्या सर्व गोष्टी निसर्गाशी घट्ट जोडलेल्या आहेत याचे भान यावे लागेल. घरात गरज नसताना विद्युत उपकरणे बंद केल्याने जागतिक हवामान बदलला कमी करण्यासाठी आपलाही सूक्ष्म हातभार लागणार आहे याची जाणीव व्हावी लागेल.
एखादे झाड लावून त्याची जोपासना केल्यास आपल्या मुलांसाठी लक्षावधी टन प्राणवायू देणारे नैसर्गिक यंत्रच आपण उभारत आहोत अशी कर्तव्य पूर्तीची भावना मनात यावी लागेल. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या कारच्या इजिनची दुरुस्ती केल्याने, किंवा कमीत कमी इंधनाचा वापर केल्याने, किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास अथवा विद्युत वाहनाला प्राधान्य दिल्यास आपण पृथ्वीच्या वातावरणात फार मोठा सकारात्मक बदल घडवण्याची जबाबदारी उचलली आहे हे नक्की. दैनंदिन जीवनात शेकडो गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने करून देखील आपण निसर्गाला अबाधित ठेवून स्वतः साठी आणि आपल्या मुलांसाठी आरोग्यदायी वातावरण आणि जगण्यायोग्या पृथ्वी बहाल करू शकतो. आपली पिढी ला मिळालेली संधी कदाचीत पुढील पिढ्यांना मिळणार नाही. हवामान बदलाचा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे आणि आणखीन काही वर्षानंतर तो रोखणे किंवा कमी करणे मानवाच्या हाताबाहेरील असेल यात शंका नाही. भरधाव वेगाने जाणारे वाहन वेळीच रोखणे सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे मात्र नियंत्रण सुटल्यावर कितीही इच्छा असून उपयोग नाही.
इच्छा न होण्याचे मुख्य कारण म्हणजे अजून तुमचे दैनंदिन कार्य वातावरणीय बदलामुळे म्हणावे तितके बाधित झालेले नाही म्हणून ही समस्या भविष्यातील समस्या असून माझे काही यात नुकसान नाही अशी विचित्र आणि स्वार्थी मानसिकता सर्वात बुध्दिमान मानवप्राणी जोपासत चाललाय. काही मायक्रो ग्राम चा मेदू लाभलेली एक लहानशी मुंगी देखील भविष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी वर्षभर आधी पासूनच प्रयत्न करते आणि  पर्जन्य काळात स्वतःला आणि आपल्या समाजाला सुखरूप ठेवते. निसर्गाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असलेल्या मानवाने भविष्यातील समस्यांना वेळीच थोपविण्यासाठी काय करावे हे वेगळे सांगण्याची खरच गरज आहे काय?

Saturday, 10 July 2021

जिवंत तुरुंग.



वरील चित्र लहानां पासून मोठ्यानं पर्यंत कुणालाही दाखवून यांतील सद्गृहस्थ किंवा Gentlemen  कोण असे विचारल्यास? नक्कीच अधिकाधिक लोक, डावीकडील चित्रावर बोट ठेवतील.
यांतील डावीकडील व्यक्ती युरोप मधील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार असून उजवीकडील व्यक्ती म्हणजे २०२१ साली  पद्मश्री पुरस्कार विजेती.

असे का? याचे उत्तर अगदी एका ओळीत देऊन तुम्हाला पटण्यासारखे नसेल कारण वरील चित्रातील उदाहरणाप्रमाणेच आपली बुद्धी हॅक झालेली आहे.

१३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात बव्हंशी लोक सांगतील जगाच्या पाठीवर जर राहण्या योग्य राष्ट्र कोणते असेल तर ते पाश्चिमात्य स्थित. मग भारत राहण्यासाठी योग्य राष्ट्र का नाही?

आज जगात भारताची जी छाप आहे तीच आपल्या मनावरही बिंबित आहे.

भारत म्हंटले कि भ्रष्टचारी, महिलांसाठी असुरक्षित, घाणीचे वास, अवैज्ञानिक श्रद्धा, गरिबी अशी अनेक चित्रे मनासमोर तरळू लागतात. सोन्याचा धूर निघणाऱ्या राष्ट्राची प्रतिमा आज अगदी तळागाळात पाहायला मिळते.

१. गौरवशाली इतिहास

जगात क्वचितच एखादे राष्ट्र असावे ज्याला हजारो वर्षांचा समृद्ध आणि गौरवशाली इतिहास लाभलेला असावा, आज जे देश विकसित आहेत त्यांनादेखील इतका प्राचीन आणि समृद्ध इतिहास लाभलेला नाही. मात्र जो काही इतिहास त्यांना लाभला आहे त्यातील अभिमान करण्यासारख्या गोष्टी त्यांनी वारंवार जगजाहीर केल्यात, आणि नागरिकांनमध्ये  अस्मितेची जाणीव निर्माण करण्यावर भर दिला.

भारताचा मात्र फक्त लुटमारीचा इतिहास सर्वज्ञात आणि सर्वजाहीर आहे, जणू गेल्या ७०० वर्षांव्यतिरिक्त भारतात काही घडलेच नसावे असे वाटू लागते, पुन्हा पुन्हा ठेचा लागूनयेत म्हणून हा इतिहास माहित असणे हि महत्वाचे  आहे. मात्र हा इतिहास म्हणजे भारताच्या समृद्ध इतिहासाचा फक्त पृष्ठभाग आहे, खोलवर पाहिल्यास भारताचा ऐतिहासिक ठेवा हा जगासाठी खजिनाच आहे.

आम्ही मात्र संस्कृतीच्या खोलीकडे पाठफिरवायची असे ठरवलेले दिसते. मुख्यत्वे गेल्या दोनशे वर्षातच डुबक्या मारायच्या, मनमुराद. शालेय जीवनात आपण ज्या गोष्टी शिकतो तीच आपली मुख्य विचारधारा बनते. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये काही मोजके गौरवशाली क्षण काही ओळींमध्ये पूर्ण केले जातात आणि लूटमार मात्र रंगीत चित्रांसहित मनावर बिंबवली जाते. जर लहान वयातच भारताचा इतिहासाचा खजिना नाही समजला तर तरुणांकडून भारतासाठी अभिमान बाळगण्याची वार्ता करू नये. कोणताही तरुण भारता बाहेर राहणेच पसंत करेल. राष्ट्रभक्तीची सुरुवात इतिहासातून होते, छत्रपती शिवाजी महाराजांना माता जिजाऊंनी जर ऐतिहासिक गौरव ऐकवला नसता तर कदाचित आपला इतिहास वेगळा असता. विवेकानंद भारतीय तत्त्वज्ञानाच्या गर्त्यात मनसोक्त पोहले नसते तर खऱ्या अध्यात्माची ओळख जगापासून दूरच राहिली असती,डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे बालपण भारताच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठिकाणी गेले नसते तर भारताने गौरव करावा असे राष्ट्रपती कसे लाभले असते? बालपणीच राष्ट्राच्या उभारणीची ठिणगी पडल्यास भविष्य उज्वलच आहेत यात शंका नाही, याची प्रथम पायरी म्हणजेच गौरवशाली इतिहास शिकवण्यावर भर असावा. आज टाय घालून मिरवणाऱ्यांना जेव्हा अंगावर कपडे घालणे हि माहित नव्हते, त्या काळी भारतीय इतिहासात अवकाशाचा वेध घेणारे ग्रंथ श्लोकबद्ध केले जात होते. भारतीयांशी व्यापार करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या कित्येक पिढ्या पश्चिमेत जन्मल्या, आणि त्यांना भारत म्हणजे एक कल्पना विश्वातील राष्ट्र का वाटायचा, हे शिकवा. भारतातून जाणाऱ्या व्यापाऱ्यांची फक्त लूटमार करून हि अनेक शहरे इतिहासाच्या नकाश्यावर अस्तित्वात आलीत, यावरून समृद्धीची झलकभर पाहायला मिळते. पृथीच्या परिवलनाविषयी सांगणाऱ्या आधुनिक विद्वानांच्याही जवळपास १००० वर्षे आधी इथल्याच मातीत आर्यभटाने त्याच गोष्टी सूत्रबद्ध केलेल्या आहेत. शांततेचा संदेश देणारे आणि मानवीय जाणिवांच्या पलीकडील अभ्यास करणारे महान इथेच जन्मले, पूर्वोत्तर भारतातील इंग्रजांना देखील न जिंकता आलेल्या आहोमांचा अजिंक्य इतिहास शालेय पुस्तकातून निसटून गेला आहे त्याला पुन्हा रचना बद्ध केला जावा. जर तुम्ही गौरवशाली इतिहास सांगितला नाही तर तरुण पिढी हि गौरवशाली भविष्यासाठी झटणार नाही हे ध्यानी राहूदे. त्यांच्या साठी पाश्चिमात्य संस्कारच आदर्श असतील.


२. जगाचे अर्थकारण:

यशस्वी जीवन असे म्हणताच सर्वप्रथम डोळ्यांसमोर एक मोठे घर, आलिशान गाडी, पुष्कळ पैसे हे सहज तरळून जाते. यशाची हि व्याख्या आपल्या डोक्यात कुणी आणली? तरुणांमध्ये देशप्रेमाची ठिणगी पाडणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यशस्वी नव्हते काय? अब्दुल कलाम यांचे यश म्हणजे नेमके काय? हजारोंच्या जीवनाला स्पर्श करणारून जीवनाच्या आत्मिक प्रगतीचा मार्ग सांगणारे बुद्ध आणि वर्धमान महावीर,गुरु गोविंद सिंग यांचे यश कोणत्या प्रकारचे होते? आज सीमेवर उभा असलेल्या सैनिकाचे यश आपल्या यशाच्या व्याख्येत मात्र बसत नाही.

तरीही हे सर्व कमालीचे यशस्वी आहेत. मग आपल्या मनात हा आर्थिक यशाचा डोंगर उभा राहण्यामागे एकमेव कारण म्हणजेच रीतसर चाललेली दिशाभूल. पहिले कारण म्हणजे अटीतटीच्या आर्थिक स्पर्धेत आपल्या उत्पादनांसाठी प्रथम गरज निर्माण केली जाते आणि उत्पादन खपवले जाते, हि गरज निर्मिती म्हणजेच पाथमिक दिशाभूल, ठराविक रंगच उत्कृष्ट, ठराविक शारिरीक बांधणीच उत्कृष्ट, ठराविक पेय पिणे म्हणजेच मर्दानी खेळ, काही उत्पादने जर लहान मुलांना दिली नाहीत तर बुद्धीचा विकास होणारच नाही, ऐषारामी जीवन जगणे म्हणजेच मौज. अश्या अनेक प्रतिमा लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवल्या जातात आणि आर्थिक गरज निर्माण होते. 

याचा अर्थ पैसे महत्वाचे नाहीत असा नाही, पैश्यांची उपयोगिता सर्वात अधिक. मात्र तो तुमच्या आयुष्या हेतू नसावा. गाडीमध्ये पेट्रोल ज्या प्रमाणे गरजेचे आहे त्याप्रमाणे पैसे महत्वाचे आहेत. मात्र आपण पेट्रोलसाठी आपण गाडी चालवत नाही. तसेच तुमचे आयुष्याचे विविध पैलू विकसित करून स्वतः चे आणि जगाचे कल्याण करण्या साठी ह्या पैश्याचा वापर होणे सर्वात हितकारक. युद्ध साहित्य निर्मिती, औषधी उत्पादने आणि सौंदर्य प्रसाधने हे जगावर अधिराज्य गाजवणारे उद्योग जो पर्यंत अस्तित्वात आहेत तो पर्यंत ह्या सर्वांची गरज हि जगात निर्माण होतच राहणार, केली जाणार. असो- यापूर्वी भारतीयांना आत्मिक स्वातंत्र्य हेच परम यश असावे असे वाटत होते, कारण त्याचे जागतिक महत्व समजावून सांगणारा इतिहास अभ्यासात होता. वसुधैव कुटुंबकं हे तेव्हापासून उगीच कुणीतरी लिहून ठेवलेलं नाहीये. आज आपल्या मानसिकतेला भोगीवादाने इतके भ्रमित केलेलं आहे कि चंगळवाद हाच आनंदाचा मार्ग अशी दिशाभूल झालेली आहे आणि वृत्तीही जड झाल्याने बदलाभिमुख तरुणाई ची संख्या शून्य होत चाललीये. यावर उपाय म्हणजेच भारतीय ज्ञानाचा खजिना जोपासून भारताला आर्थिक महासत्ता बनवणे यासाठी आधी उद्योगी व्यक्तिमत्वाची उद्यमात सकल समृद्धी या भारतीय सुभाषितशी ओळख करून द्यावी आणि मग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उत्पादनाच्या स्पर्धेत उतरावे. कागदांव्यतिरिक्त प्रत्यक्ष कृतीत लक्ष्य दिल्यास पुढील काळात लाखो उद्योगी घडवता येऊ शकतील.

कारण जे राष्ट्र आर्थिक रित्या बलवान जग त्यांचेच ऐकेल. आणि आत्मिक मूल्यांशिवाय शिवाय महासत्ता बनू पाहणारी राष्ट्रे जगासाठी धोकाच निर्माण करतील, कारण त्यांची भाषा सर्वसमावेशक कधीच होऊ शकत नाही, फक्त आणि फक्त कुरघोडीची वृत्तीच पाहायला मिळेल.

तरुणांना भारतात राहून आर्थिक समृद्धी साधण्याची भाषा न शिकवल्यास इतिहासाच्या अपुऱ्या ज्ञानामुळे प्रत्येकाला पश्चिमेकडील वातावरणाचा लळा लागण्याची शक्यता जास्तच राहील.


३. भ्रष्टचाराचा राक्षस

कोठून आला हा राक्षस जवळपास सर्वच व्यवस्था गिळंकृत केलेला हा महाकाय भस्मासुर टेबलाच्या पलीकडेच आहे असे समजून फक्त दोषारोप करू नयेत. यासाठी सर्वस्वी जबाबदार आपणच. मतदानापासून तो सुरु होतो. इतिहासातील मूल्य शिक्षणाचा अभाव, आर्थिक गरज जास्त त्यामुळे हांजी हांजी करून बलशाली व्यक्तीला निवडून दिल्यावर तो कान पिळणारच. याउलट फक्त आणि फक्त तुमच्या लहानश्या गावात किंवा नगरात जो व्यक्ती निस्वार्थपणे झटत  असतो त्यालाच निवडून द्यावे. आणि निवडून दिल्यावर जाब विचारायची हि सवय लावून घ्यावी. सत्तेची गणिते सहज सोपी बनतील. आधी आपल्यातला भस्मासुर काढून टाकावा म्हणजे व्यवस्थेतूनही तो निघून जाईल. व्यवस्था म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून आपल्यासारखीच षडरीपूंनि ग्रस्त माणसं, भरकटलेली. भ्रष्टाचाराचा हा सुरुंग उडवून लावल्याशिवाय, भारताला उद्योगी राष्ट्र बनवणे अवघड, फक्त मूल्य शिकवून जग घडणार नाही, आर्थिक महासत्ता हि बनावे लागेल म्हणजे जगात मूल्यांचे संवर्धन करता येईल.

अश्या अनेक बाबींमध्ये लक्ष्य घालून पहिल्यांदा भारतीयांमध्ये भारताबद्दल अभिमान जागृत केला जावा, अन्यथा भावी पिढीची सद्गृहस्थाची, मूल्यांची, जीवनाची आणि भारताची व्याख्या बदलत राहील आणि भारताला एक जिवंत तुरुंग मानून, यातून सुटून जाण्यातच धन्यता मानणाऱ्या अनेक पिढ्या तयार होतील, अन त्यात वावगे काहीच नसेल.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...