Saturday 10 July 2021

जिवंत तुरुंग.



वरील चित्र लहानां पासून मोठ्यानं पर्यंत कुणालाही दाखवून यांतील सद्गृहस्थ किंवा Gentlemen  कोण असे विचारल्यास? नक्कीच अधिकाधिक लोक, डावीकडील चित्रावर बोट ठेवतील.
यांतील डावीकडील व्यक्ती युरोप मधील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार असून उजवीकडील व्यक्ती म्हणजे २०२१ साली  पद्मश्री पुरस्कार विजेती.

असे का? याचे उत्तर अगदी एका ओळीत देऊन तुम्हाला पटण्यासारखे नसेल कारण वरील चित्रातील उदाहरणाप्रमाणेच आपली बुद्धी हॅक झालेली आहे.

१३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात बव्हंशी लोक सांगतील जगाच्या पाठीवर जर राहण्या योग्य राष्ट्र कोणते असेल तर ते पाश्चिमात्य स्थित. मग भारत राहण्यासाठी योग्य राष्ट्र का नाही?

आज जगात भारताची जी छाप आहे तीच आपल्या मनावरही बिंबित आहे.

भारत म्हंटले कि भ्रष्टचारी, महिलांसाठी असुरक्षित, घाणीचे वास, अवैज्ञानिक श्रद्धा, गरिबी अशी अनेक चित्रे मनासमोर तरळू लागतात. सोन्याचा धूर निघणाऱ्या राष्ट्राची प्रतिमा आज अगदी तळागाळात पाहायला मिळते.

१. गौरवशाली इतिहास

जगात क्वचितच एखादे राष्ट्र असावे ज्याला हजारो वर्षांचा समृद्ध आणि गौरवशाली इतिहास लाभलेला असावा, आज जे देश विकसित आहेत त्यांनादेखील इतका प्राचीन आणि समृद्ध इतिहास लाभलेला नाही. मात्र जो काही इतिहास त्यांना लाभला आहे त्यातील अभिमान करण्यासारख्या गोष्टी त्यांनी वारंवार जगजाहीर केल्यात, आणि नागरिकांनमध्ये  अस्मितेची जाणीव निर्माण करण्यावर भर दिला.

भारताचा मात्र फक्त लुटमारीचा इतिहास सर्वज्ञात आणि सर्वजाहीर आहे, जणू गेल्या ७०० वर्षांव्यतिरिक्त भारतात काही घडलेच नसावे असे वाटू लागते, पुन्हा पुन्हा ठेचा लागूनयेत म्हणून हा इतिहास माहित असणे हि महत्वाचे  आहे. मात्र हा इतिहास म्हणजे भारताच्या समृद्ध इतिहासाचा फक्त पृष्ठभाग आहे, खोलवर पाहिल्यास भारताचा ऐतिहासिक ठेवा हा जगासाठी खजिनाच आहे.

आम्ही मात्र संस्कृतीच्या खोलीकडे पाठफिरवायची असे ठरवलेले दिसते. मुख्यत्वे गेल्या दोनशे वर्षातच डुबक्या मारायच्या, मनमुराद. शालेय जीवनात आपण ज्या गोष्टी शिकतो तीच आपली मुख्य विचारधारा बनते. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये काही मोजके गौरवशाली क्षण काही ओळींमध्ये पूर्ण केले जातात आणि लूटमार मात्र रंगीत चित्रांसहित मनावर बिंबवली जाते. जर लहान वयातच भारताचा इतिहासाचा खजिना नाही समजला तर तरुणांकडून भारतासाठी अभिमान बाळगण्याची वार्ता करू नये. कोणताही तरुण भारता बाहेर राहणेच पसंत करेल. राष्ट्रभक्तीची सुरुवात इतिहासातून होते, छत्रपती शिवाजी महाराजांना माता जिजाऊंनी जर ऐतिहासिक गौरव ऐकवला नसता तर कदाचित आपला इतिहास वेगळा असता. विवेकानंद भारतीय तत्त्वज्ञानाच्या गर्त्यात मनसोक्त पोहले नसते तर खऱ्या अध्यात्माची ओळख जगापासून दूरच राहिली असती,डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे बालपण भारताच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठिकाणी गेले नसते तर भारताने गौरव करावा असे राष्ट्रपती कसे लाभले असते? बालपणीच राष्ट्राच्या उभारणीची ठिणगी पडल्यास भविष्य उज्वलच आहेत यात शंका नाही, याची प्रथम पायरी म्हणजेच गौरवशाली इतिहास शिकवण्यावर भर असावा. आज टाय घालून मिरवणाऱ्यांना जेव्हा अंगावर कपडे घालणे हि माहित नव्हते, त्या काळी भारतीय इतिहासात अवकाशाचा वेध घेणारे ग्रंथ श्लोकबद्ध केले जात होते. भारतीयांशी व्यापार करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या कित्येक पिढ्या पश्चिमेत जन्मल्या, आणि त्यांना भारत म्हणजे एक कल्पना विश्वातील राष्ट्र का वाटायचा, हे शिकवा. भारतातून जाणाऱ्या व्यापाऱ्यांची फक्त लूटमार करून हि अनेक शहरे इतिहासाच्या नकाश्यावर अस्तित्वात आलीत, यावरून समृद्धीची झलकभर पाहायला मिळते. पृथीच्या परिवलनाविषयी सांगणाऱ्या आधुनिक विद्वानांच्याही जवळपास १००० वर्षे आधी इथल्याच मातीत आर्यभटाने त्याच गोष्टी सूत्रबद्ध केलेल्या आहेत. शांततेचा संदेश देणारे आणि मानवीय जाणिवांच्या पलीकडील अभ्यास करणारे महान इथेच जन्मले, पूर्वोत्तर भारतातील इंग्रजांना देखील न जिंकता आलेल्या आहोमांचा अजिंक्य इतिहास शालेय पुस्तकातून निसटून गेला आहे त्याला पुन्हा रचना बद्ध केला जावा. जर तुम्ही गौरवशाली इतिहास सांगितला नाही तर तरुण पिढी हि गौरवशाली भविष्यासाठी झटणार नाही हे ध्यानी राहूदे. त्यांच्या साठी पाश्चिमात्य संस्कारच आदर्श असतील.


२. जगाचे अर्थकारण:

यशस्वी जीवन असे म्हणताच सर्वप्रथम डोळ्यांसमोर एक मोठे घर, आलिशान गाडी, पुष्कळ पैसे हे सहज तरळून जाते. यशाची हि व्याख्या आपल्या डोक्यात कुणी आणली? तरुणांमध्ये देशप्रेमाची ठिणगी पाडणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यशस्वी नव्हते काय? अब्दुल कलाम यांचे यश म्हणजे नेमके काय? हजारोंच्या जीवनाला स्पर्श करणारून जीवनाच्या आत्मिक प्रगतीचा मार्ग सांगणारे बुद्ध आणि वर्धमान महावीर,गुरु गोविंद सिंग यांचे यश कोणत्या प्रकारचे होते? आज सीमेवर उभा असलेल्या सैनिकाचे यश आपल्या यशाच्या व्याख्येत मात्र बसत नाही.

तरीही हे सर्व कमालीचे यशस्वी आहेत. मग आपल्या मनात हा आर्थिक यशाचा डोंगर उभा राहण्यामागे एकमेव कारण म्हणजेच रीतसर चाललेली दिशाभूल. पहिले कारण म्हणजे अटीतटीच्या आर्थिक स्पर्धेत आपल्या उत्पादनांसाठी प्रथम गरज निर्माण केली जाते आणि उत्पादन खपवले जाते, हि गरज निर्मिती म्हणजेच पाथमिक दिशाभूल, ठराविक रंगच उत्कृष्ट, ठराविक शारिरीक बांधणीच उत्कृष्ट, ठराविक पेय पिणे म्हणजेच मर्दानी खेळ, काही उत्पादने जर लहान मुलांना दिली नाहीत तर बुद्धीचा विकास होणारच नाही, ऐषारामी जीवन जगणे म्हणजेच मौज. अश्या अनेक प्रतिमा लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवल्या जातात आणि आर्थिक गरज निर्माण होते. 

याचा अर्थ पैसे महत्वाचे नाहीत असा नाही, पैश्यांची उपयोगिता सर्वात अधिक. मात्र तो तुमच्या आयुष्या हेतू नसावा. गाडीमध्ये पेट्रोल ज्या प्रमाणे गरजेचे आहे त्याप्रमाणे पैसे महत्वाचे आहेत. मात्र आपण पेट्रोलसाठी आपण गाडी चालवत नाही. तसेच तुमचे आयुष्याचे विविध पैलू विकसित करून स्वतः चे आणि जगाचे कल्याण करण्या साठी ह्या पैश्याचा वापर होणे सर्वात हितकारक. युद्ध साहित्य निर्मिती, औषधी उत्पादने आणि सौंदर्य प्रसाधने हे जगावर अधिराज्य गाजवणारे उद्योग जो पर्यंत अस्तित्वात आहेत तो पर्यंत ह्या सर्वांची गरज हि जगात निर्माण होतच राहणार, केली जाणार. असो- यापूर्वी भारतीयांना आत्मिक स्वातंत्र्य हेच परम यश असावे असे वाटत होते, कारण त्याचे जागतिक महत्व समजावून सांगणारा इतिहास अभ्यासात होता. वसुधैव कुटुंबकं हे तेव्हापासून उगीच कुणीतरी लिहून ठेवलेलं नाहीये. आज आपल्या मानसिकतेला भोगीवादाने इतके भ्रमित केलेलं आहे कि चंगळवाद हाच आनंदाचा मार्ग अशी दिशाभूल झालेली आहे आणि वृत्तीही जड झाल्याने बदलाभिमुख तरुणाई ची संख्या शून्य होत चाललीये. यावर उपाय म्हणजेच भारतीय ज्ञानाचा खजिना जोपासून भारताला आर्थिक महासत्ता बनवणे यासाठी आधी उद्योगी व्यक्तिमत्वाची उद्यमात सकल समृद्धी या भारतीय सुभाषितशी ओळख करून द्यावी आणि मग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उत्पादनाच्या स्पर्धेत उतरावे. कागदांव्यतिरिक्त प्रत्यक्ष कृतीत लक्ष्य दिल्यास पुढील काळात लाखो उद्योगी घडवता येऊ शकतील.

कारण जे राष्ट्र आर्थिक रित्या बलवान जग त्यांचेच ऐकेल. आणि आत्मिक मूल्यांशिवाय शिवाय महासत्ता बनू पाहणारी राष्ट्रे जगासाठी धोकाच निर्माण करतील, कारण त्यांची भाषा सर्वसमावेशक कधीच होऊ शकत नाही, फक्त आणि फक्त कुरघोडीची वृत्तीच पाहायला मिळेल.

तरुणांना भारतात राहून आर्थिक समृद्धी साधण्याची भाषा न शिकवल्यास इतिहासाच्या अपुऱ्या ज्ञानामुळे प्रत्येकाला पश्चिमेकडील वातावरणाचा लळा लागण्याची शक्यता जास्तच राहील.


३. भ्रष्टचाराचा राक्षस

कोठून आला हा राक्षस जवळपास सर्वच व्यवस्था गिळंकृत केलेला हा महाकाय भस्मासुर टेबलाच्या पलीकडेच आहे असे समजून फक्त दोषारोप करू नयेत. यासाठी सर्वस्वी जबाबदार आपणच. मतदानापासून तो सुरु होतो. इतिहासातील मूल्य शिक्षणाचा अभाव, आर्थिक गरज जास्त त्यामुळे हांजी हांजी करून बलशाली व्यक्तीला निवडून दिल्यावर तो कान पिळणारच. याउलट फक्त आणि फक्त तुमच्या लहानश्या गावात किंवा नगरात जो व्यक्ती निस्वार्थपणे झटत  असतो त्यालाच निवडून द्यावे. आणि निवडून दिल्यावर जाब विचारायची हि सवय लावून घ्यावी. सत्तेची गणिते सहज सोपी बनतील. आधी आपल्यातला भस्मासुर काढून टाकावा म्हणजे व्यवस्थेतूनही तो निघून जाईल. व्यवस्था म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून आपल्यासारखीच षडरीपूंनि ग्रस्त माणसं, भरकटलेली. भ्रष्टाचाराचा हा सुरुंग उडवून लावल्याशिवाय, भारताला उद्योगी राष्ट्र बनवणे अवघड, फक्त मूल्य शिकवून जग घडणार नाही, आर्थिक महासत्ता हि बनावे लागेल म्हणजे जगात मूल्यांचे संवर्धन करता येईल.

अश्या अनेक बाबींमध्ये लक्ष्य घालून पहिल्यांदा भारतीयांमध्ये भारताबद्दल अभिमान जागृत केला जावा, अन्यथा भावी पिढीची सद्गृहस्थाची, मूल्यांची, जीवनाची आणि भारताची व्याख्या बदलत राहील आणि भारताला एक जिवंत तुरुंग मानून, यातून सुटून जाण्यातच धन्यता मानणाऱ्या अनेक पिढ्या तयार होतील, अन त्यात वावगे काहीच नसेल.

1 comment:

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...