संदर्भ लागल्या शिवाय आपल्याला गोष्टींची उकल होणे जरा अवघडच. अचानक कुणीतरी व्यक्ती आपल्याला रस्त्यावर भेटते, आपल्याशी बोलते मात्र ती व्यक्ती या आधी आपल्याला नेमकी कोठे भेटली होती याचा संदर्भ कधी कधी आपल्याला सापडत नाही. अन खूप विचार केल्यानंतर अचानक आठवते कि कोणत्यातरी कार्यक्रमा दरम्यान तुमची भेट त्या व्यक्तीशी झाली होती, म्हणजेच संदर्भ सापडतो.
संदर्भ म्हणजेच भूतकाळातील माहितीचे संकलन होय. मनाच्या भल्यामोठ्या कोठारात अनेक प्रसंग माहिती स्वरूपात साठवून ठेवले जातात तेही बऱ्याचदा आपल्या नकळतच. पुढे ह्याच माहितीच्या आधारे आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू नकळतच घडत जातात. म्हणूनच भारतीय संस्कृतीत पूर्वीपासून संस्कारांना अत्यंत महत्व दिले जाते. मुलं लहान असल्यापासून त्याच्या मनावर सुसंस्कार व्हावेत याकरिता अनेक परंपरा निर्माण केल्या गेल्यात. काही अपवाद वगळता, हल्ली अश्या स्वरूपाची कोणतीही सक्षम व्यवस्था दिसून येत नाही त्यामुळे व्यक्ती लहानपणा पासूनच तंत्रज्ञानाच्या ह्या युगातील माहितीच्या महासागरातून मिळेल ती माहिती संकलित करून त्याचा संदर्भ म्हणून भावी आयुष्यात वापर करते. त्यामुळे तरुण पिढी आजकाल थोडी स्वैर वागु लागत असेल तरी वावगे वाटू नये. कुटुंब संस्थेतहि सुसंस्कारांच्या परंपरांची व्यवस्था लोप पावल्यामुळे पुढे सामाजिक आणि राष्ट्रीय स्थरावर तिचे अस्तित्व धूसर होऊ लागले आहे. त्यामुळे अश्या उपलब्ध माहितीचा स्वयं संचित संदर्भ व्यक्तीच्या आयुष्यात दूरगामी परिणाम करीत असल्यामुळे कधी कधी उपलब्ध माहितीचा आधार जर भ्रम असेल तर व्यक्ती दिशाहीन होण्याची शक्यताच जास्त. आणि त्याहून कठीण परिस्थिती हि असेल कि दिशाहीन असूनही मार्गस्थ असल्याचा भ्रम मात्र सतत या व्यक्तीला होत राहील.
वरील बाब दृष्टी भ्रमाच्या उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूयात,
वरील चित्रात दिसणाऱ्या 'A' आणि 'B' या दोन्ही चौरसांचा रंग कोणता असे विचारल्यास, काळा आणि पांढरा असे उत्तर अनेकांकडून मिळते. प्रत्यक्षात मात्र ह्या दोन्ही चौरसांचा रंग अगदी एकसारखाच आहे. मात्र यावर मन विश्वास ठेवायला तयार होत नाही कारण त्या दोन्ही चौरसांना आपण त्याच्या शेजारील चौरसाच्या संदर्भातून पाहत असतो. शेजारील चौरसां कडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे आपण स्पष्ट अगदी स्पष्ट पणे काळा किंवा पांढरा हे अगदी परस्पर विरोधी रंग पाहतो, तेही एकसारख्या असणाऱ्या चौरसांमधूनच.
आपल्या मनात सर्व ज्ञानेंद्रियांमार्फत जी माहिती एकत्रित केली गेली आहे ती अश्याच संदर्भांचं काम करीत असते आणि आपल्या मानसिक विचारसरणीला आणि व्यक्तिमत्वाला काळ्या किंवा पांढऱ्या स्वरूपात उभारणी देत असते. संदर्भांच्या अभेद्य भिंतींना भेदून जीवनाकडे स्पष्ट पणे पाहता यावं या करीत आपण सर्वानी प्रयत्न करायला हवा. आपल्या व्यक्तिमत्वाचे, जातीधर्माचे, सामाजिक आणि आर्थिक असे अनेक भ्रमित करणारे संदर्भ मनात खोलवर रुजले जातात आणि त्या पलीकडे पाहणे अवघड होऊन बसते. स्वतः च्या क्षमतांच्या बाबतीत, इतर व्यक्तीच्या अथवा गोष्टींच्या बाबतीत भूतकाळातील संदर्भ हाच एकमात्र संपूर्ण आधार न मानता तटस्थ राहून अनुमान लावल्यास बाबी अधिक स्पष्टपणे दिसू लागतील. तसेच मनाच्या गाभाऱ्यात साठलेल्या संदर्भांना एकदा तपासून हि घ्यावे कदाचित भ्रमाचा घट्ट पगडा दूर होऊ शकेल आणि जीवनाला नव्याने आणि अधिक स्पष्ठतेणे पाहता येऊ शकेल आणि या आधी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी हि तुम्ही नव्याने शक्य करू शकाल अन स्वतः कडे पाहण्याचा तुमचा संदर्भ च बदलेल.
No comments:
Post a Comment