पर्यावरण किंवा निसर्ग हा आपल्या पासून वेगळा आहे असे समजण्याची चूक आपण करतो आणि मानवाकडून होणार निसर्गाचा ऱ्हास कसा कमी करता येईल याविषयी कल्पना करू लागतो.
हे संबंध विश्व एकच निसर्ग असून अस्तित्वात असलेली प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्ट एकमेकांना प्रभावित करीत निसर्गाची लय टिकवून ठेवीत असते. मग सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधील गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने प्राप्त झालेली स्थिरता असो किंवा एखाद्या मधमाशीकडून अजाणतेपणे होणारे हजारो परागकणांचे रोपण ज्यातून आजवर लक्षावधी वृक्षांची जंगले उभी राहिलीत.
माणूस या सर्व नैसर्गिक व्यवस्थे मध्ये कोणत्यातरी कोपऱ्यातील एक घटक आहे. नैसर्गिक व्यवस्थेला चालवणाऱ्या साखळी मध्ये आपण सर्वोच्च स्थानी नसून, फक्त चैतन्य प्राप्तीच्या बाबतीत सुदैवी ठरलो. इतर सजीव आणि निर्जीव सृष्टीशी तुलना करता मानवाला होणार चेतनेचा बोध सर्वोच्च आहे. त्या अर्थी, मानवाने समस्थ सृष्टीच्या संचलनात मोलाचे योगदान देऊन प्रस्थापित निसर्ग व्यवस्था वृद्धिंगत करणे अपेक्षित आहे.
प्राप्त बुद्धीमुळे स्वतःला सर्वेसर्वा समजण्याची घोडचूक आपण करीत आहोत आणि आपल्या अस्तित्वाचा आधार असलेल्या निसर्गाला आपल्यापासून वेगळे समजून केवळ आणि केवळ आपल्या षड्रिपूंवर आधारित गरजा पूर्ण करण्याच्या लालसेपोटी निसर्गरूपी वृक्षाच्या मुळावर घाव घालीत असून ह्याच वटवृक्षावर आपले देखील घरटे आहे हे आपण पुरते विसरत चाललेलो आहोत.
पुराणकाळात उदयाला आलेल्या कोणत्याही संस्कृतीची बीजे निसर्गावर असलेले मानवाचे अवलंबित्व ओळखून निसर्गाचा आदर करण्यात सापडतात. मात्र गेल्या काही शतकांमध्ये अचानक उदयाला आलेली आधुनिक संस्कृती निसर्गापासून तुटत चालली असून केवळ अज्ञानामुळे आपण निसर्गाच्या शक्तीला दुर्लक्षित करत आहोत. अद्ययावत उपकरणे म्हणजेच मानवजातीचा आधार असे काहीसे मत तरुणांमध्ये तयार होताना दिसून येते. मात्र मानवासारखे उत्कृष्ट उपकरण बनवणाऱ्या निसर्गाच्या किमयेला दुर्लक्षित करून कसे चालेल.
अगदी अणुच्या घडणी पासून ते मानवीय चेतनेचा विकास करण्यापर्यंत निसर्गाने सूक्ष्म गोष्टींमध्ये देखील गफलत केलेली नाहीये. जैविकअभियांत्रिकीचा महासंचालक निसर्ग आपण रोजच्या व्यवहारात ध्यानात सुद्धा घेत नाही हे नवलंच. शे दोनशे वर्षांपूर्वी पर्यंत मात्र भारतीय आणि इतर काही संस्कृतीतील लोक निसर्ग शक्तींच्या प्रति आदरभाव व्यक्त करीत दिवसाची सुरुवात आणि शेवट करत असत. आणि आज हा आदरभाव व्यक्त करणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण असे समजणारा अतिहुशार समाज अस्तित्वात येताना दिसतोय.
विश्वोत्पत्ती आणि उत्क्रांतीच्या महायज्ञातून निघालेला एक सूक्ष्म घटक म्हणजे मानव. मानवाचे अस्तित्व टिकून राहण्या करीत साहाय्य करणारे अब्जावधी इतर सजीव आणि निर्जीव घटक आपल्या नकळत मात्र अविरतपणे कार्य करीत आहेत, आणि जो पर्यंत त्यांच्या कार्यात काही अडथळा येत नाही तो पर्यंत याची जाणीवदेखील आपल्याला होत नसते.
मागील सत्रात पहिल्या प्रमाणे आपल्याला मोफत मिळणारा प्राणवायू लक्षावधी वर्षांपूर्वी एकदिवसाचे आयुष्य जगून सायनो बॅक्टरीया ह्या एकपेशीय जिवाने वातावरणात आणून आपल्याला देणगी दिली. पृथ्वीच्या शिलावरणातील खनिजे आणि मूलद्रव्ये खेचून घेऊन तुम्हाला प्राप्त असलेले सुदृढ आणि सुडौल शरीर बनवण्याकरिता हजारो वनस्पती आपले जीवन व्यतीत करीत आहेत. आपण ज्या दिशेला पाहू त्यादिशेला आपल्या अस्तित्वासाठी कारणीभूत तत्वे आणि घटना सापडतील, ज्यांचा रचयिता सर्वशक्तिमान निसर्ग शिवाय दुसरा कुणी नाही.
प्रदूषण कमी करावे, झाडे लावा, पाणी वाचवा यानं सारख्या घोषणा देऊन काही निद्रितावस्थेतील लोकांना जागृत करण्याची मुळात गरजच का भासावी अज्ञानाने शिखर का गाठावे?
सर्वोच्च बुद्धिमत्ता लाभलेल्या मानवाला स्वतः ची मूलभूत गरज कोणती याची स्वतंत्र्य जाणीव का करून द्यावी लागावी? याचे उत्तर एकाच, आधुनिकीकरणाच्या नावाखाली तयार झालेली ज्ञानी असल्याचा आभास घडवणारी अज्ञानी वृत्तीची होत असलेली जोपासना. ज्या वृत्तीचे मूळ कारण भोगीवादाचा काही अंशी केलेला स्वीकार होय. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास भोगीवाद म्हणजे पंचेंद्रियांच्या तृप्तीची सतत वाढ करीत राहणे होय.
येथे आधुनिकीकरणाला किंवा तांत्रिक प्रगतीला विरोध नाहीये, मात्र जीवन अधिकाधिक आरामदायी करण्याच्या मानसिकतेला बदलणे आवश्यक वाटते, जीवन अधिकाधिक सुव्यवस्थित आणि तांत्रिक दृष्ट्या प्रगत असणे मानवासाठी सुखकर आणि काही वेळेस गरजेचे सुद्धा आहे यात कोणतीही शंका नाही. मात्र हे सर्व निसर्गाचा ऱ्हास करून प्राप्त करावे हे मात्र स्वतः च्या विरोधात एक दीर्घ कारस्थान करण्यासारखेच म्हणावे लागेल. ज्याचे परिणाम कालांतराने दिसू लागतील किंबहुना जगातील मुख्य शहरांतील खालावलेली भूजल पातळी आणि महासागराची वाढणारी पाण्याची पातळी याचे प्रमाण देऊ लागली आहे. आपण कोठे जात आहोत याची जाणीव आपल्याला झालेली आहे आणि आंतरराष्टीय स्थरावर हा परिणाम कमी करण्यासाठी काही प्रयत्न झालेले हि दिसून येतात. मात्र सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था वेळेत यशस्वी होणे अवघडच. अर्थव्यवस्थेने प्रभावित किंवा ग्रसित आंतरराष्ट्रीय व्यवहार थांबवणे इतके सोपे नसून, या संस्थांचा वातावरणातील कार्बन नियंत्रित करण्याचा प्रयत्न निव्वळ गोगलगाय असून त्यामुळे वातावरणीय बदलाच्या वादळी वेगाला थोपवणे महाकठीण. या कामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थानि केलेले प्रयत्न अपुरेच राहतील, कायम, जो पर्यंत तुमचा सक्रिय सहभाग यात नाही. सक्रिय सहभाग न होण्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाशी आपले तुटत चाललेले नाते. सर्वप्रथम निसर्गाशी पुन्हा नाते जोडणे आवश्यक आहे. किमान १० पैकी ८ जणांना खरीखुरी जाणीव व्हावी लागेल कि शुद्ध हवा हि वायफाय पेक्षा जास्त महत्वाची आहे तसेच आपले आरोग्य, आर्थिक प्रगती, सामाजिक शांतता ह्या सर्व गोष्टी निसर्गाशी घट्ट जोडलेल्या आहेत याचे भान यावे लागेल. घरात गरज नसताना विद्युत उपकरणे बंद केल्याने जागतिक हवामान बदलला कमी करण्यासाठी आपलाही सूक्ष्म हातभार लागणार आहे याची जाणीव व्हावी लागेल.
एखादे झाड लावून त्याची जोपासना केल्यास आपल्या मुलांसाठी लक्षावधी टन प्राणवायू देणारे नैसर्गिक यंत्रच आपण उभारत आहोत अशी कर्तव्य पूर्तीची भावना मनात यावी लागेल. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या कारच्या इजिनची दुरुस्ती केल्याने, किंवा कमीत कमी इंधनाचा वापर केल्याने, किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास अथवा विद्युत वाहनाला प्राधान्य दिल्यास आपण पृथ्वीच्या वातावरणात फार मोठा सकारात्मक बदल घडवण्याची जबाबदारी उचलली आहे हे नक्की. दैनंदिन जीवनात शेकडो गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने करून देखील आपण निसर्गाला अबाधित ठेवून स्वतः साठी आणि आपल्या मुलांसाठी आरोग्यदायी वातावरण आणि जगण्यायोग्या पृथ्वी बहाल करू शकतो. आपली पिढी ला मिळालेली संधी कदाचीत पुढील पिढ्यांना मिळणार नाही. हवामान बदलाचा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे आणि आणखीन काही वर्षानंतर तो रोखणे किंवा कमी करणे मानवाच्या हाताबाहेरील असेल यात शंका नाही. भरधाव वेगाने जाणारे वाहन वेळीच रोखणे सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे मात्र नियंत्रण सुटल्यावर कितीही इच्छा असून उपयोग नाही.
इच्छा न होण्याचे मुख्य कारण म्हणजे अजून तुमचे दैनंदिन कार्य वातावरणीय बदलामुळे म्हणावे तितके बाधित झालेले नाही म्हणून ही समस्या भविष्यातील समस्या असून माझे काही यात नुकसान नाही अशी विचित्र आणि स्वार्थी मानसिकता सर्वात बुध्दिमान मानवप्राणी जोपासत चाललाय. काही मायक्रो ग्राम चा मेदू लाभलेली एक लहानशी मुंगी देखील भविष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी वर्षभर आधी पासूनच प्रयत्न करते आणि पर्जन्य काळात स्वतःला आणि आपल्या समाजाला सुखरूप ठेवते. निसर्गाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असलेल्या मानवाने भविष्यातील समस्यांना वेळीच थोपविण्यासाठी काय करावे हे वेगळे सांगण्याची खरच गरज आहे काय?
No comments:
Post a Comment