Sunday, 14 February 2021

असा साजरा केला व्हॅलेंटाईन डे.

व्हॅलेंटाईन डे म्हंटलं कि तरुणांच्या डोळ्यातून भरभरून उत्साह वाहू लागतो, जोडीदाराच्या शोधार्थ किंवा जोडीदाराच्या प्रेमार्थ अश्या स्वरूपाचा दिवस म्हणून गणला जाणारा हा दिवस जवळपास जगभरात साजरा होतो. याच दिवसाचे औचित्य साधून मानवजातीवर नकळत पणे आपल्या प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या खऱ्या सोबती वृक्षांच्या उपकारांची एक नगण्य परत फेड म्हणून आम्ही दोघांनी एक पिंपळाचे रोप उंबर्ली येथील पक्षी अभयारण्यात लावले, आणि यापुढे प्रत्येक छान प्रसंग वृक्ष लावूनच साजरा करण्याचा निर्धारहि केला आहे.

वृक्ष वल्ली आम्हा सोयरी.. अशी संस्कृती इथल्या मातीतच नव्हे तर प्रत्येक मनात रुजलेली आणि बहरलेली सुद्धा, मात्र हजारभर वर्षे परकीय छत्राखाली जगल्या नंतर आम्हाला आपल्याच मातीचा दरवळ परका होऊ लागला आणि आज परकेच आपल्याला मातीत रुजलेले प्रेम शिकवू लागलेत, मायभूमीत दडलेल्या आणि जगाच्या कल्याणाचे सामर्थ्य असलेल्या प्रेममय भारतीय संस्कृतीचा विसर पडत कामा नये.

नजीकच्या भविष्यात वातावरणीय बदलांमुळे होणारे परिणाम आपल्या पुढील पिढयांना भोगू लागू नयेत याची जबाबदारी तुमची आमचीच आहे, कदाचित पुढील पिढीच्या नंतर हवामान बदलाचा वेग आवरता येणे अवघड बनून जाईल, आणि गेल्या २०-३० वर्षांत वाढलेल्या वादळांची संख्या, मोठ्या जंगलांना लागणाऱ्या आगीची संख्या, आणि म्युटेट झालेली विषाणूंची संख्या आपण पहिलीच असेल, हे सर्व म्हणजेच हवामान बदलांचे सुरुवातीचे परिणाम आहेत, हिमनगाचे वितळणे आणि समुद्र सपाटीची वाढणारी उंची हि त्याहूनही मोठी समस्या असेल, भूजल पातळीत होणाऱ्या घटीमुळे काय होऊ शकते हे केपटाऊन आणि चेन्नई सारख्या शहरांनी हल्लीच अनुभवलंय, समस्यांची हि यादी न संपणारी आहे, यावर सर्वात मोठा उपाय म्हणजेच कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हिरवे कव्हर वाढवणे, कार्बन बजेटला नियंत्रित करणारी मोठी यंत्रणा जागतिक स्थरावर कार्यरत आहे ज्यात अनेक विकसित आणि विकसनशील देश सामील आहेत, मात्र कागदोपत्री उत्कृष्ट दिसणाऱ्या ह्या यंत्रणा प्रत्यक्षात किती परिणामकारक सिद्ध होतील हे तर येणारा काळच सांगेल, एक मात्र नक्की, अर्थव्यवस्था आणि पर्यावण व्यवस्था यांच्या द्वंद्वात लघु काळासाठी अर्थव्यवस्थाच जिंकणार, आणि दीर्घकाळात काय होईल हे आपण सर्वाना अंदाज लावणे सोपेच आहे.
जागतिक यंत्रणांचे असो, आपल्या सारखे काही द्रुष्ठा ज्यांना याची जाणीव झालेली आहे अश्यानी काय करावं, तर प्रथम जितकी झाडे लावून त्यांचे संगोपन करता येईल तितके करावे, आणि वैयक्तिक स्थरावर कार्बन उत्सर्ग कसा कमी करता येईल याचे अवलोकन करून कार्बन आणि तत्सम ग्रीनहाऊस वायूंचे आपल्याकडून कमीत कमी उत्सर्जन होईल याची खबरदारी घ्यावी. स्वतः हुन या बदलांना जाणून घेण्यासाठी निरीक्षण आणि अभ्यास करावा.

निसर्ग वाचवण्याची सर्वच जबाबदारी पुढच्या पिढीवर न सोडता आपली जबाबदारी आपणच संभाळुयात, एक सुजाण पालक, आजोबा, आज्जी म्हणून पुढील पिढीला परिणाम भोगायला लागूनये म्हणून प्रयत्न करूयात. कारण असंच निस्वार्थी प्रेम आजच्या व्हॅलेंटाईन डे च्या प्रसंगी अपेक्षित असावं.

1 comment:

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...