मंजिल मिल ही जायेगी भटकते ही सही,
गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं.
कधीतरी वाचलेल्या ह्या ओळी प्रत्यक्षात अनुभवल्या तेही शब्दशः अर्थाला तंतोतंत जुळू शकणाऱ्या प्रसंगाने.
वर्षभरा पूर्वी धावण्याची आवड निर्माण झाली अन फारसे न धावणाऱ्याचा अल्ट्रा रनर केंव्हा झाला कळलेही नाही.
फार मोठी झेप घेऊन मोठी मंजिल प्राप्त केलीये असा हा प्रसंग नाहीये, गोष्ट एका लहानश्या लक्ष्य प्राप्तीची आहे,
पण मनाशी ठरवलेली लहानशी लक्ष्य पूर्तीहि आनंदाचा एक क्षण नक्कीच देऊन जाते, असे अनेक क्षण मिळून एकंदर आयुष्याची परिभाषा आपल्याला उमगत असते. `
रविवार आला अन पूर्वी कधीही न गेलेल्या डोंगरराईतून वाट शोधत कसाबसा कुठेतरी टेकडीवर जाऊन पोहोचलो, अन कळले कि इथे तर अनेक डोंगररांगा आहेत अन मला घरातून दिसणारं झाड मात्र दूरदूरवर कोठेही नाही, म्हणतात न दुरून डोंगर साजरे, मात्र पूर्वी पासूनच डोंगरदऱ्यांतून फिरण्याचा अनुभव असल्यामुळे, नवीन वाट बनवत आणखीन काही टेकड्या पालट्या घातल्या, एव्हाना संपूर्ण अंगावर निरनिरळ्या झुडपांनी अनेक प्रकारच्या रेघोट्या ओढल्या होत्या, अन बऱ्यापैकी परागकण कपड्यांवर चिकटून माझ्या सोबतच फिरत होते.
गुगल मॅप धुंडाळण्या पासून ते तार्किक अंदाज लावण्या पर्यंत सर्व काही केले, मात्र डोंगराच्या कुशीत कुठेतरी दडी मारून बसलेला तो वृक्ष काही सापडेना, एव्हाना उन्ह चांगलेच तापू लागले, सोबत आणलेले पाणी केव्हाच पोटात जाऊन घामाच्या थेंबातुन गळूनहि गेले होते. जवळपास ६-७ किलोमीटर धावायचं असं ठरलेलं मात्र प्रत्यक्षात १५ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर धुंडाळण्यामुळे पार झालेले. पुन्हा लवकरच नव्या दमाने येथे यायचे आणि जागेचा योग्य अंदाज लावून नक्कीच त्या दुरून खुणावणाऱ्या वृक्षाला स्पर्श करायचेच असे ठरवून परतलो.
त्या नंतर गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली चे ६० किलोमीटर चे अंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त धावण्याच्या सरावात गुंतून गेलो, अन काही दिवस पुन्हा डोंगरात शिरलोच नाही.
मात्र काहीदिवसांतच कल्याण डोंबिवली रनर्स यांच्या तर्फे आयोजित एक ग्रुप रन मध्ये सहजच सहभागी झालो, त्या दरम्यान अंबरनाथ- बदलापूर हायवे वर धावत असताना, अचानक रस्त्याच्या बाजूला दूरवर एक टेकडी दिसली अन रस्ता सोडून पुन्हा जंगलाच्या दिशेने धाव घेतली, थोड्याच वेळात टेकडी पादाक्रांत झाली आणि पलीकडील एक आणखीन उंच टेकडी खुणावू लागली, तिलाही सरकरण्याच्या इच्छेपोटी पुढे धावत असताना अचानक साक्षात्कार व्हावा असे उमगले कि काही दिवसांपूर्वी ज्या डोंगरात शिरलो होतो त्याचीच हि विरूद्ध बाजू आहे अन अपूर्ण राहिलेला तो वृक्षशोध पुन्हा नव्याने सुरु करण्याची उत्कट इच्छ बळावली,पुन्हा उभी धाव घेतली, 'भलं' हे पक्षी अभयारण्य असून इथे शहरी गर्दीपासून दूर असलेल्या विविध मनमोहक पक्ष्यांचे वास्तव्य अनुभवास येते, त्या मोहक पक्ष्यांच्या सोबतीत जवळपास तासभर शोध घेतल्यावर एका झुडुपामागून अचानक प्रकट झालेल्या त्या, हो त्याच वृक्ष राजाचे दर्शन झाले, आणि इच्छा पूर्तीच्या आनंदाने तो क्षण भरून गेला, कुणीतरी जुना सवंगडी भेटावं असे त्या वृक्ष स्पर्शाने जाणवले, काहीवेळ तेथे एकांतात घालवून पुन्हा हायवे वर परतलो अन ग्रुप रनर्स सोबत त्यांच्या परतीच्या वाटेवर सामील होऊन पुन्हा गर्दीचा एक भाग होऊन गेलो.
एकंदर काय तर, गोष्ट, स्वप्न, लक्ष्य उद्देश, लहान असो किंवा मोठे एकदा का तुमच्यात उत्कट इच्छा निर्माण झाली कि क्षमता आणि वाट आपोआपच दिसू लागते, अवघड असली तरी त्यावाटेवर चालण्याचं धाडस करावं,आणि अगदी आपल्याही नकळत आपलं मन आपल्याला योग्य दिशेने नेऊ लागते, फक्त इतकंच करायचं कि आपल्या अंतर्भूत असलेल्या नैसर्गिक ऊर्जेत प्रवाही राहायचं, अवरोधात अडकून पडायचा नाही, आपलं मन आणि जीवनउर्जा आपल्याला योग्य स्थानी घेऊन जाण्यास समर्थ आहेत.
No comments:
Post a Comment