मानवजाती साठी सर्वात मोठे ३ धोके म्हणजेच, अणु युद्ध, उत्परीवर्तीत विषाणूची साथ,आणि हवामान बदल.
यातील अणु युद्ध थांबवण्यासाठी सक्षम यंत्रणा अस्तित्वात आहे आणि तिचे आजतागायत मानवाकडून पालन हि होताना दिसत आहे. याउलट जागतिक स्थरावर साथीचे रोग थांबवण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणे अभावी आज संपूर्ण जग प्रभावित झाले आहे.
हवामान बदललाविषयी सांगायचे झाल्यास, यंत्रणा अस्तित्वात तर आहे मात्र तिचे पालन तितकेसे होताना दिसत नाही. पॅरिस करारा अनुसार जागतिक राष्ट्रांना कार्बन बजेट दिल्या नंतर ही अनेक बडी राष्ट्रे यातून हात काढून घेताना दिसून येतात. कारण, मुळात मिळालेल्या कार्बन बजेट च्या अनुसार प्रत्येक राष्ट्राने कमीत कमी कार्बन वातावरणात सोडणे जबाबदारीचे बनते, आणि कमी कार्बन उत्सर्जन म्हणजेच उद्योग धंद्याच्या वाढी आणि विकासाला चाप बसवणे. आजच्या अटीतटीच्या स्पर्धेत कोणतेही राष्ट्र जागतिक हवामान सांभाळण्यासाठी स्वतःची अर्थव्यवस्था पणाला लावू शकणार नाही, आणि हेच घडते आहे. बडी राष्ट्रे वातावरणीय बदलांचा अस्वीकार करताना दिसत आहेत, हे प्रकरण मानवजातीच्या अस्तिस्त्वा विषयी मर्यादित न राहता, ते आता अर्थव्यवस्था विरूध्द वातावरण व्यवस्था असे पहिले जात आहे, नक्कीच या लढाईत अर्थव्यवस्था ठराविक कालावधी साठी जिंकणार आहे. मात्र दीर्घ काळात चित्र उलटलेले असेल आणि पुन्हा मागे वळण्याची संधी आपण गमावून बसलेलो असू. जवळपास ६०० पेक्षा जास्त जीव प्रजातींचे गेल्या १०० वर्षात पूर्णपणे उच्चाटन झाले असून कमीत कमी १० लाख प्रजाती आज उच्चाटन होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत, पुढील काही वर्षात हा आकडा वाढण्याची फार शक्यता आहे, गेल्या १०० वर्षात पृथ्वीचे तापमान ०.८२ सेल्सिअने वाढले असून, नजीकच्या काळात ही वाढ १.५ सेल्सिअस इतकी असेल आणि ह्या तापमान वाढी मुळे अकल्पित परिणामांना सामोरे जावे लागेल.
काही शहरांमधील खालावलेली भूजल पातळी आणि त्यामुळे पाण्यासाठी होणारी वणवण ही सुरुवात आहे. ध्रुवीय क्षेत्रातील वितळणाऱ्या बर्फामुळे तर अनेक स्थरावर विपरीत परिणामांना सामोरे जावे लागेल, ज्यात समुद्राची वाढलेल्या पातळी मुळे किनाऱ्या वरील शहरे पाण्याखाली तर जातीलच पण लक्षावधी वर्षांपासून, अगदी डायनासोर च्या वेळेपासून जे विषाणू ध्रुवीय बर्फाखाली सुप्तावस्थेत गाडले गेलेले आहेत ते पुन्हा वातावरणात येतील आणि मानवी प्रतिकार क्षमतेला आजतागायत माहितीही नसलेल्या विषाणूचा प्रतिकार करणे अशक्यच. आज याचे जिवंत उदाहरण आपण पाहतोय, यातून जर काही शिकू शकलो नाही तर पुढील ३० वर्षानंतर निसर्ग कदाचित शिकण्याची संधी देणार नाही.
हवामानाचे बारकाईने अध्ययन केल्या नंतर काढेलेले हे निष्कर्ष, सामान्य माणसाकडून दुर्लक्षित केले जातात, याचे कारण असे आहे की, त्याचा परिणाम लगेच ह्या क्षणी दिसत नाही, आणि आपली व्यवस्था अशी प्रस्थापित आहे की ज्यात ' ह्या क्षणाला' जर काही त्रास होत असेल तरच त्या कडे लक्ष्य पुरवले जाते, मग ३० -५० वर्षा नंतर होणाऱ्या परिणामांची मी का चिंता करू? तुमची मुलं आणि नात यांना होणाऱ्या असह्य त्रासाबद्दल तुमचा हाच दृष्टीकोण दोषी असणारा आहे. आजच्या पिढीकडे वातावरणीय बदलांना थांबवण्याचे आणि शक्य झाल्यास उलट करण्याची नैतिक जबाबदारी आपोआपच आली आहे, पुढील पिढीला ते काम करण्या इतपत वेळ कदाचित शिल्लक नसेल आणि आधीची पिढी त्या करिता पुरेसे प्रयत्न करू शकली नाहीये.
त्यामुळे डोळेझाक करून चालणार नाही. वतावरणीय बदल हे खरे की खोटे हे पाहण्यासाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालाची गरज उरली नाहीये, ऋतुमानात झालेले बदल आपण सर्व अनुभवतोय, भूजल पातळी खालावल्यामुळे शुष्क पडत चालली चेन्नई सारखी आणि साऊथ आफ्रिकेतील काही शहरे यांची ज्वलंत उदाहरणे आहेत, वादळनच्या संख्येत झालेली वाढ आणि अनेको विषाणूंचे होणारे उत्परीवर्तन काही लपून राहिले नाहीत मात्र जाणूनबुजून आपण त्याकडे दुर्लक्ष करण्याचां पर्याय निवडलेला दिसून येतो. ज्याचे परिणाम पुढील काही पिढ्यांना भोगावे लागतील आणि त्यासाठी जबाबदार असू आपण.
आपण प्रत्येकाने स्वतः अभ्यास करून आपल्या कडून कार्बन किवा इतर विघातक वायूंचे आणि पदार्थांचे उत्सर्जन कमीत कमी होईल या साठी प्रयत्न करायला हवा, तसेच अधिकाधिक वातावरण पोषक गोष्टी अमलात आणायला हव्यात,जसे झाडे लावणे आणि जगवणे. अनेक सोपे आणि करण्यायोग्य उपाय आज इंटरनेट वर आणि UN सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत, ते तपासून कोणत्या प्रकारे आपल्याला योगदान देता येईल याची पाहणी प्रत्येकाने पुढाकार घेऊन करावी. आपल्यातल्या प्रत्येकाने लहान योगदान दिल्यास नक्कीच सकारात्मक परिणाम साधता येईल, ही जबाबदारी कोणतेही सरकार किंवा राष्ट्र एकट्याने पूर्ण करू शकणार नाही कारण तुमच्या आमच्या गरजा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी ही राष्ट्रीय आणि स्थानिक शासनावर आहे, त्यामुळे सर्वोत्कृष्ट योगदान देताना त्यांना अडथळे येवू शकतात, म्हणूनच, एकट्या सरकार वर ही जबाबदारी न सोडता मुख्यतः ती आपली जबाबदारी म्हणून आपण प्रयत्न करायला हवा.
कोणाची ही वाट न पाहता या समस्येवर आपण आपल्या परीने काय करू शकतो याचा स्वतः शोध घ्यावा, तुम्ही दिलेल्या योगदान बाबत तुमची मुले आणि नातू नक्कीच तुमचे आभारी असतील.
https://www.un.org/en/actnow/
No comments:
Post a Comment