Tuesday 12 January 2021

युवा दिनाच्या निमित्ताने..


आपल्या ओघवत्या वाणीने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करून सोडणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनी भारतवर्षात साजरा केल्या जाणाऱ्या युवा दिनाच्या निमित्ताने प्रत्येक उत्साही तरुणाला शुभेच्छा.
''मला १०० उत्साही तरुण द्या आणि मी भारताला संपूर्ण रूपांतरित करेन'' असे छाती ठोक पणे सांगणाऱ्या विवेकानंदांचा युवकांवरील विश्वास यातून दिसून येतो.
'उत्साह नये भारत का' हि थीम घेऊन साजरा होणार आजचा युवा दिवस, तरुणांना आशेची नवीन किरणे म्हणून पाहणारा आहे. आजची युवा पिढी आजपर्यंतच्या सर्वात शक्तिशाली युवापिढीनपैकी आहे, तंत्रज्ञानाचे धारदार अस्त्र, तल्लख आणि जाणीव निर्माण झालेली बुद्धिमत्ता, क्षणार्धात सम्पूर्ण जगापर्यंत पोहोचण्याची क्षमता, या सर्वांत पारंगत असललेला आजचा युवक मानवजातीची एक मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन उभा आहे, आर्थिक सामाजिक, भौगोलिक, वातावरणीय, जैविक अश्या अनेक उदयोन्मुख समस्या ह्याच युवकांकडे आशेने पाहत आहेत, त्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करून आपले योगदान देणे प्रत्येक युवकाने आपले कर्तव्यच समजावे.
मर्यादित वृत्तीचा त्याग करून इतरांसाठी प्रेरणा बनून युवकांनी स्वतः ची आणि समाजाची प्रगती साधण्यावर लक्ष्य केंद्रित करावे. आवाहनांना निर्भीडपणे सामोरे जाण्याची वृत्ती म्हणजेच तरुणांचा विशेष गुण. आपल्यातील तरुण वृत्तीला धाडसाची साथ देत स्वप्नपूर्तीच्या दिशेने झेप घेण्याचा संकल्प तरुणानी आजच्या दिवशी विवेकानंदाच्या प्रसिद्ध सुविचाराने करावा, "उठा, जागे व्हा आणि तो पर्यंत थांबू नका जो पर्यंत ध्येय प्राप्ती होत नाही".
विवेकानंदानी जागाल ओळख करून दिलेली समृद्ध भारतीय संस्कृती जपण्याचा संकल्प आपण करावयास हवा, पाश्चिमात्य डोळ्यांनी भारताकडे नं पाहता उत्कृष्ट जीवन पद्धती म्हणून भारतीय संस्कृतीची खोली अभ्यासावी, तर्काच्या लहानश्या चौकटीतून तुम्हाला महासागराचे दर्शन होणे शक्य नाही, भारतीय उपखंडात निर्मित संस्कृतीला आत्मदर्शनच्या माध्यमातून अनेको तेजस्वी व्यक्तींनी आकार दिलेला आहे, ह्या ऐतिहासिक खजिन्याचा स्वतः हुन अभ्यास न करता इतरांशी तुलना करू नये. भारतीय संस्कृतीच्या उगमाच्या मूळ स्रोतांचा अभ्यास करून,  तपासून पाहावे, आणि आपले मत बनवावे.
संपूर्ण जीवन परिव्राजक म्हणून व्यतीत करीत भारत भ्रमण करत पुढे देशोदेशी प्रवास करून संपूर्ण जीवन समाज उद्धाराच्या आणि जागृतीच्या वैश्र्विक कार्याला समर्पित करणाऱ्या स्वामी विवेकानंदाना आणि त्यांच्या विचारांना शतशः नमन. त्यांनी प्रज्वलित केलेला उत्सहाचा हा दीप तुमच्या मनात सदैव तैवत राहूदे.
- तुषार महाडीक

No comments:

Post a Comment

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...