Friday 1 January 2021

माझी पहिली अल्ट्रा मॅरेथॉन

अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे नेमकं काय?

मॅरेथॉन ही लांब पल्ल्याची शर्यत असून शर्यतीचे अधिकृत अंतर ४२.१९५ किलोमीटर इतके आहे. सहसा मॅरेथॉन रस्त्यांवरून धावली जाते. ग्रीस मधील मॅरेथॉन या ठिकाणी चालू असलेल्या लढाईपासून ते अथेन्सपर्यंत विजयाचा संदेश धावत जाऊन देणारा ग्रीक सैनिक फेडीपिपाईडस याच्या धावण्याच्या स्मरणार्थ अशी शर्यत जगभरात आयोजित केली जाते. अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे ४२.१९५ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर धावण्याची शर्यत. काही ठिकाणी ५० किलोमीटर, १०० किलोमीटर किंवा ५०० किलोमीटर इतकं अंतर धावण्याच्या शर्यती हि आयोजित केल्या जातात. धावण्याचे आव्हान कठीण व्हावे याकरिता माउंटन अल्ट्रा रन किंवा, अल्ट्रा ट्रेल रन म्हणजेच डोंगरदऱ्यातून धावणे अश्या शर्यतींचे आयोजन केले जाते.

मी भाग घेतलेली शर्यत ह्याच प्रकारातली होती. 

SRT अल्ट्रा ज्यात 53 किलोमीटरचे अंतर डोंगर दर्यातून धावत, पुण्यातील तीन महत्वाचे किल्ले, सिंहगड, राजगड, आणि तोरणा एकाच धावेत सर करायचे होते अन तेही ठरलेल्या वेळेतच अन्यथा डिसक्वालिफाय म्हणजेच स्पर्धेतून बाद होण्याची टांगती तलवार लटकलेलीच.

SRTअल्ट्रा गेल्या तीन वर्षांपासून वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने आयोजित केली जाते. देशविदेशातील अनेक धावक या स्पर्धेच्या आवाहनात्मक स्वरूपामुळे आकर्षित होतात अन शेकडोंच्या संख्येने सहभागी होतात, किंबहुना कित्येक धावकांच्या संकल्प यादीत ह्या शर्यतीने स्थान मिळवलेले आहे, शर्यतीतील २३२० मीटर ची उभी चढाई ह्या स्पर्धेला काठिण्याच्या वेगळ्याच स्थरावर नेते, काही ठिकाणी दोरीच्या साहाय्याने चढावे अथवा मार्गक्रमण करावे लागते, अन मोबदला म्हणून वाटेत अतिशय नयनरम्य देखाव्यांची पर्वणीच मिळते. सह्याद्रीचे सौंदर्य आणि कणखरता दोन्ही हि ह्या एकाच धावेत अनुभवता येऊ शकतात.

तीन महिन्यांपूर्वी SRT अल्ट्रा ची जाहिरात पहिली अन मनाशी पक्के केले कि हे आव्हान आपण पूर्ण करायचे, अश्या प्रकारच्या शर्यतींसाठी परिपूर्ण तय्यारीची गरज असते, तो पर्यंत मी अर्ध मॅरेथॉन म्हणजेच २१ किलोमीटर चे अंतर धावू शकत असे, त्यापलीकडे फारसे धावणे होत नसे, अन डोंगरदऱ्यातून तर नव्हेच नव्हे. हाल्फ मॅरेथॉन पेक्षा जास्त धावण्याच्या कोणत्याही शर्यतीसाठी शारीरिक तयारी सोबत मानसिक तयारी होणे अतिशय गरजेचे आहे, कारण सर्वसामान्यांच्या बाबतीत २५ किलोमीटर धावल्यानंतर शारीरिक क्षमता उत्तर देऊ लागते, पेटके येऊ लागतात, थकवा जाणवू लागतो, अन पुढील अंतर पार करण्यासाठी स्वतः ला सतत प्रेरित करत राहावे लागते. तयारी सुरु केली अन सुदैवाने माझ्या सारखेच तयारीला लागलेले काही मित्र हरीश तरीकर, हॅरी अय्यर, भरत रायकर, वैभव तोडणकर, मितेश आणि गगन यांची भेट झाली, एकत्रित पणे आम्ही दोन वेळेस डोंगर दर्यातून धावण्याचा प्रबळगड आणि श्रीमलंगड या ठिकाणी  सराव केला, सरावा दरम्यान लक्ष्मण गुंडप सरांचे मार्गदर्शन मला लाभले, याचा सर्वतोपरी परिणाम म्हणूनच शर्यतीकरीता गरजेची शारीरिक तयारी पूर्ण होऊ शकली, मानसिक आणि आंतरिक तयारीच्या बाबतीत योग चैतन्य केंद्रातील योगाभ्यास, प्राणायाम आणि दीर्घ श्वसनाचा आणि सद्गुरूंच्या ध्यानाचा अभ्यास उपयोगी ठरला, वरकरणी सहज वाटणारा आणि धावकाच्या तयारीत  समाविष्ट नसलेला हा भाग व्यक्तीला आंतरिक ऊर्जा देतो याची प्रचिती मात्र स्वानुभवातूनच घेता येऊ शकते.

सकाळी अगदी ६ च्या ठोक्याला वाजत गाजत शर्यत प्रारंभ झाली, पुढे भल्यामोठ्या सिंहासारखा ध्यानस्थ बसलेल्या सिंहगडचा माथा गाठेपर्यंत पुरतीच दमछाक झाली, पुढे डोंगर माथ्यावरून अनेक लहान लहान टेकड्या पार करत कल्याण दरवाजातून खाली उतरू लागलो, अगदी त्याच वेळी तळपता सूर्य मात्र आकाशात वर सरकू लागला. सिंहगड उतरताना अगदी नाकासमोर सुदूर अंतरावर एक अस्पष्ट भला मोठा पर्वत नजरेच्या टप्प्यात येतो, तोच हा राजगड, जवळपास २५ किलोमीटर अंतरावर स्थित. ईतक्या दूरवर दिसणारा हा राजगड म्हणजे निम्मा मार्ग सुद्धा नाही याची जाणीव होते.. रानवाटेवर आणि काही गावातून धावत पुढे राजगडाच्या पायथ्यावर २५ किलोमीटर चे अंतर पूर्ण होते, इथपर्यंत पोहोचेपर्यंत माझ्यासारख्या सामान्य धावकाचे पाय मात्र बोलू लागतात, काही मिनिटांचा ब्रेक घेत पुन्हा ताजेतवाने होऊन राजगडा ची चढाई प्रारंभ केली आणि थकवा म्हणजे नेमकं काय याची अनुभूती आली, मात्र राजगड चढून पूर्ण होई पर्यंत मनाला उसंत नव्हती, अनेक वर्षे महाराजांचे वास्तव्य असलेल्या राजगडावरून सुवेळा माचीवर अन त्यानंतर संजीवनी माचीवरून पुढे जात पहिला कट ऑफ पार करे पर्यंतच्या मार्गावर सह्याद्रीच्या मनोरम्य स्वरूपाचे दर्शन होते, असीम निळ्या आकाशाची चादर पांघरलेल्या अन चहुबाजूनी अफाट पसरलेल्या ह्या निधड्या पर्वतरांगा प्रत्येकाने एकदातरी पाहाव्यात.

दैवी आणि शारीरिक कृपेमुळे पहिला ३४ किलोमीटर अंतरावरील कट ऑफ २ तास आधीच पार केला आणि पुढे तोरण्याच्या दिशेने कूच केली, राजगड ते तोरणा दरम्यानचा मार्ग म्हणजेच शिरेवरील वाट, जवळपास १०-१२ किलोमीटरचे अंतर डोंगररांगांच्या शिखरांवरून पार करावे लागते, जिवंत निसर्ग चित्रांचा खजिनाच ह्या वाटेवर तुम्हाला सापडेल.

४०-४२ किलोमीटर चे अंतर पार केल्यावर येणारी तोरणागडाची अगदी ८०-८५ अंशांची चढाई म्हणजे मानसिक खच्चीकरणाचा अतोनात प्रयत्न,  अगदी रेंगत रेंगत हि चढाई पूर्ण करून तोरणा गाठला आणि स्वराज्याचे पहिले तोरण बांधलेल्या ह्या प्रचंडगडाच्या नावाचे गमक उमगले,

पुढे तोरणा उतरून झाल्यावर जवळपास ७ किलोमीटर अंतर पार करत शर्यत एक शाळेच्या प्रांगणात पूर्ण होते. शेकडो धावकांतून फक्त ८७ धाविक ज्यांनी हि शर्यत पूर्ण केली त्यात ३३ व्या स्थानावर माझी पहिली अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करतानाच क्षण अजूनही तितकीच ऊर्जा आणि परिपूर्तीचा आनंद देतो, जितका प्रत्यक्षात फिनिशिंग लाईन पार करताना झाला होता.

अतिशय योजनाबद्ध पद्धतीने आयोजित SRTअल्ट्रा आणि तितकेच उत्साही आयोजक आणि स्वयंसेवक आणि एकमेकांना प्रेरित करीत, मदत करत धावणारे आणि मानवतेचे उत्कृष्ट उदाहरण देणारे स्पर्धक यांचा उल्लेख केल्या शिवाय लेख पूर्ण करणे अशक्यच.

ज्यांना आपल्या क्षमतांची मर्यादा थरार अनुभवत ओलांडायची आहे त्यांनी नक्कीच अश्या प्रकारच्या शर्यतीमध्ये  भाग घायला हवा आणि आयुष्य एका वेगळ्याच दृष्टिकोनातून अनुभवायला हवा.



7 comments:

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...