Wednesday, 10 June 2020

जगण्याचा उद्देश शोधताना..




विश्वाच्या ह्या अनंत पसाऱ्यात कोठेतरी एक कणभर आकाराचा ग्रह असावा त्यावर सूक्ष्म आकाराचे काही जीव निर्मित व्हावेत, अविश्वसनीय रित्या त्यांतील एकाला स्वतःच्या आणि विश्वाच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी, अन स्वतःच्या आयुष्याचा उद्देश त्या जिवाने शोधावं, सारे काही अगदी विस्मयकारकच म्हणावे लागेल.
मुळात ह्या अकल्पित योगायोगाचा माध्यमातून अवतरलेल्या मानवजातीच्या अस्तित्वाला अर्थ प्रदान करण्याचं काम बुद्धिमत्ता करत असते, अन स्वतः सोबत इतरांनाही ह्या योगायोगाचा जास्तीत जास्त लाभ कसा व्हावा यासाठी आयुष्याला एक उद्देश देण्याची आसक्ती निर्माण होते, पुढे काहींना तो लवकरच सापडतो मात्र काहींना अनेक वर्षे त्याकरीता गवसणी घालावी लागते.
मूळ प्रश्न असा आहे कि खरंच जगण्याचा उद्देश शोधणं गरजेचं आहे का? तर असा कोणताही नियम अथवा सक्ती नाहीये. त्यामुळे जरी उद्देश सापडला नसेल तरी अगदी खंत वाटण्याची गरज नाहीये. सृष्टा निसर्गाद्वारे निर्मित सर्वकाही परस्परावलंबी आणि निसर्गाच्या अंतिम उद्देशाला पूरकच आहे. कदाचित याची प्रचिती आपल्या बाह्य निरीक्षक बुद्धीला अद्याप झाली नसावी मात्र ह्या पृथीवतालावरील  परस्परावलंबी वातावरणात आपल्या असण्याला फार मोठा अर्थ आहे.
वैयक्तिक स्तरावर पाहिल्यास प्रत्येकाला आपापल्या सचेत जाणिवेनुसार आपल्या जगण्याचा उद्देश ठरवण्याचे वरकरणी स्वातंत्र्य असते या जाणिवेच्या माध्यमातून आपल्या द्वारे जीवनाचा उद्देश शोधण्याचा प्रयंत्न करतो.
मुळात आपण आपले अनुभव, स्मृती, भावना आणि ज्ञानाच्या आधारावर आपापल्या उद्धेशाला ठरवण्याच्या प्रक्रियेला प्रभावित करत असतो, आपल्या संस्कृतीचीहि यात फार मोठी भूमिका असते. २०० वर्षां पूर्वी चा काळ पाहिल्यास बहुतेक पौर्वात्य राष्ट्रांमधील लोकं अंतिम सत्याची प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्ती करणे हाच जगण्याचा सर्वोत्कृष्ठ उद्देश मानीत असत, त्या साठी जीवनात विविध मार्ग अवलंबून अन कर्तव्य करत राहण्यावर त्यांचा भर असे मात्र नंतर च्या बदलत्या काळात पाश्चिमात्य वारे वाहू लागल्याने उद्देशांचं स्वरूप हे जीवनाला अधिकाधिक आरामदायी बनवणे अन इंद्रिय तृप्ती च्या आनंदाकडे वळू लागले मात्र काही अंशी सामाजिक बांधिलकीचा एक पाश्चिमात्य दृष्टिकोनही यात समाविष्ट आहे अन त्यामुळे समाजतात आपले योगदान देण्याच्या ओढीची छटा आधुनिकतेच पुरस्कार करणार्यां मध्ये दिसून येतेच, म्हणजेच पाश्चिमात्य विचारांत निव्वळ  भोगीवाद नाहीये तर इतरही सामाजिक पैलूंचा विचार आहे. या सर्वांचा परिपाक म्हणजेच आज आपण 'स्वतः चा विकास' आणि 'सामाजिक योगदान'  या दोन परिमाणात आपापले उद्धेश निश्चित करण्याचं प्रयत्न करतो.

उद्देशाचा शोध कसा घ्यावा?
    इथे मला उद्देश आणि ध्येय यात फरक जाणवतो, जीवनात ध्येये अनेक असू शकतात मात्र जीवनाचा उद्देश एक च असू शकते, उद्देश प्राप्ती च्या मार्गावर आपण अनेक ध्येयरुपी मैलाचे शिलाखंड पार करतो.
    कोणत्या हि समाज कार्याची सुरुवात स्वतः पासूनच होत असते म्हणूनच स्वतःच्या मूलभूत गरजा म्हणजेच जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी, अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण (आर्थिक, सामाजिक, शारीरिक) पूर्ण होण्याकडे सुरुवातीला आपला कल असावा त्या नंतर आत्मपरीक्षण करून स्वतः जाणून घ्यावे. ह्या दोन्ही गोष्टीची परिपूर्ती हि  उद्देश निश्चितीच्या कार्यातील आपली प्राथमिक ध्येये आपण समजू शकतो.

या दोन्ही गोष्टींची परिपूर्ती झाल्या नंतर जीवनाचा उद्देश ठरवण्यासाठी स्वतःला आपण काही प्रश्न विचारू शकतो, 
१. माझ्या जवळ अशी कोणती गोष्ट, वस्तू अथवा गूण आहे जो मी इतरांना देऊ शकतो अथवा शिकवू शकतो?
२. ती गोष्ट मी नेमक कोणाला देऊ अथवा शिकवू शकतो?
३. त्यांना ती गोष्ट दिल्यास अथवा शिकवल्यास समाजात काय बदल होणार आहे?
४. इतरांना ती गोष्ट देण्यासाठी मला नेमकं काय करावं लागेल?

    सर्व प्रश्नांची एकंदरीत उत्तरे उदाहरणाद्वारे समजून घेऊयात, एखाद्या व्यक्तीला स्वतः चा संगणकीय स्वरूपाचा व्यवसाय सुरु करावयाचा असल्यास, माझ्या जवळ संगणकीय ज्ञान आहे ज्याद्वारे मी  विशिष्ठ स्वरूपाच्या व्यवसायांना किंवा व्यक्तींना त्यांच्या विशिष्ठ स्वरूपाच्या कार्यात उपयोगी  पडेल असे उत्पादन अथवा सेवेची निर्मिती करून विशिष्ठ स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवल्यास त्यांचे कार्य अथवा जीवन विशिष्ट बाबतीत सुखकर होईल अथवा त्यांच्या विशिष्ट स्वरूपाच्या गरजा पूर्ण होतील, अन समाजात सकारात्मक बदल घडून येईल. असा व्यवसाय हा समाजात बदल घडवून आणेल आणि स्थापन करणाऱ्याच्या जीवनाला उद्धिष्ट प्राप्त करून देईल.
    दुसरे उदाहरण पाहुयात, राष्ट्र सेवेची उत्कंठा, नेतृत्व गूण आणि अदम्यसाहस अंगीभूत असल्याने या राष्ट्र सेवेच्या 
कार्या करीत स्वतःतील आणखीन काही विशिष्ठ अन गरजेच्या असलेल्या गुणांचा विकास करून मला सैन्यात जाऊन मातृभूमीच्या सेवेखातर जीवन व्यतीत करावयाचे आहे ज्यायोगे मी राष्ट्र संरक्षणा सारख्या महान कार्यात सहभागी होऊ शकेन.
    आणखीन एका उदाहरणाद्वारे समजूयात, मला शिकवण्याची कला अवगत असून ती इतर गरजू अथवा इच्छुक असणाऱ्या व्यक्तींना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रित्या मी शिकवू शकेन ज्याद्वारे अनेकांना त्यांच्या क्षेत्रात उत्तम कार्य करता येईल अन उत्तमरित्या शिक्षण दिल्याने शैक्षणिक क्षेत्रात अन समाजात मी मोठा बदल घडवून आणू शकेन.
    शेवटचे उदाहरण पाहुयात, मला पर्यावरण विषयक क्षेत्रात उत्तम ज्ञान असून, अनेक सामाजिक कार्यक्रमांद्वारे ते ज्ञान मी माझ्या सारख्या पर्यावरण वादी लोकांना देऊन प्रत्यक्षात पर्यावर संरक्षणाचे कार्य करवून घेव वातावरणीय बदलांना उलट्या दिशेने घेऊन जाण्याचे कार्य करू शकतो, ज्यायोगे मानवा पुढे येणाऱ्या बिकट संकटाना मी कमी करू शकेन.
    मला पुन्हा सारांशरूपी नमूद करावेसे वाटते, वरील तिन्ही उदाहरणात मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नंतर आत्मपरीक्षण करून उद्देश प्राप्तीकडे झेप घेण्याचा विचार मांडला गेला आहे त्याद्वारे स्वतः चा आणि समाजाचा दोन्हींचा विकास साधला जाण्याची शक्यता तसेच ज्या क्षेत्रात उद्देश निश्चित करीत आहोत त्याचे ज्ञान असून त्यात गती हि आहे हे निश्चित झाल्या नंतरच पुढील पायरी चा विचार केला गेलेला आहे अन कदाचित ह्या पद्धतीने आपले जीवनाचा उद्देश निश्चित करणे आपणास सोपे जाऊ शकेल. 

No comments:

Post a Comment

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...