अगदी लहानपणा पासूनच अवकाशस्थ ग्रहगोलांचे आकर्षण वाटत असल्याने तारकां चे टिमटिमने, त्यांचे मनोकाल्पित आकार ह्यांत मन रमत असे. जिज्ञासूपणामुळे पुढे अवकाशाचा अभ्यास करण्याचा छंदच जडला अन आजही तो कायम आहे. भुरळ पाडणाऱ्या या खगोलशास्त्र विषयक जे साहित्य वाचनात आले त्यात प्रामुख्याने पाश्चिमात्य जगतातील वैज्ञानिकानी ह्या गूढ आकाशातली रहस्य कशी उलगडलीत हे वाचून फारच रोचक वाटे. आजही अनेक बुद्धिमान शास्त्रज्ञ आणि त्यांचे खगोलशास्त्रातील अकल्पनीय योगदान या पुढे मन नतमस्तक होते.
मध्यंतरीच्या काळात प्राचीन भारतीय साहित्य आणि तत्वज्ञान याविषयी जिज्ञासा उत्पन्न झाल्याने काही प्राचीन भारतीय पुस्तके चाळवळीत अन एक जाणीव झाली कि फार मोठा ठेवा आपण भारतीय दुर्लक्षित करत आहोत, कदाचित अनभिज्ञपणे किंवा वर्षानुवर्षे परकीय छत्राने भारतीयांच्या मनावर भारतीय संस्कृतीला फक्त दूषित केल्या गेलेल्या चालीतरीतींच्या दृष्टिकोनातून दाखवून दूषण लावल्या मुळे आपला ही दृष्टिकोन बदलला असावा.
संस्कृतीचा मूळ उगम स्रोत फक्त काही प्रदूषित चालीरीतींपेक्षा भिन्न असून तो आत्मज्ञानावर आधारित आहे.
खगोलीय वस्तूंचा अभ्यास आणि प्राचीन भारतीय लिखाण यात साधर्म्य असलेली काही उदाहरणे सापडतात ती येथे नमूद करीत आहे.
पृथ्वी हि आकाराने गोल आहे अन सूर्याभोवती भ्रमण करीत आहे असा निष्कर्ष निकोलस कोपर्निकस याने इसवी सन १४५० साली त्याच्या दि रेवोलूशनिबूस या पुस्तकात मांडला अन अनेक खगोल प्रेमींनी तो उचलून धरला, तत्पूर्वी ग्रीक तत्ववेत्ता आणि जगजेत्या सिकंदरचा गुरु आसलेल्या ऍरिस्टोटलप्रणित मानवकेंद्रित सिद्धांत अनेक दशके प्रस्थापित होता, ज्यानुसार पूर्ण विश्व हे मानव केंद्रित आहे अन पृथी हि सपाट आहे अशी प्रबळ धारणा होती.
पाश्चिमात्य मध्ययुगीन काळाच्या हजारो वर्षे आधी रचलेल्या काही भारतीय ग्रंथांमध्ये पृथी चा उल्लेख 'भूगोल' असा आढळतो. यात दोन शब्द आहेत 'भू' आणि 'गोल' इतका सहजरित्या उल्लेख करण्यात आलेला शब्द कसा सुचला असावा तेही इतक्या प्राचीन काळी? ज्यांनी हे ग्रंथ लिहिलेत त्यांना कसे माहित असावे कि भू हि गोल आहे? त्यांनी 'भूसमतल' असा एखादा शब्द का वापरला नसावा? या प्रश्नाचं एकच शक्य असलेल उत्तर आहे, कि त्या काळी लोकांना ज्ञात असावं कि आपली पृथ्वी हि गोल आहे.
अश्या अनेक संकल्पना ज्या आधुनिक वैज्ञानिकांनी शोधल्या त्या संकल्पनां ची नावं त्याचं मूळ स्वरूप वर्णन करणारी अन् साध्या शब्दांत प्राचीन ग्रंथांमध्ये नमूद केलेली सापडतात उदाहरणार्थ सूर्या भोवती सर्व ग्रह फिरतात, आणि पृथ्वी एक गतिमान वस्तू आहे ह्या दोन्ही चा उल्लेख 'सूर्यमालिका' अन 'जगत'(ज्याला गती आहे असे) असा आढळतो. अनेक मंदिरांमध्ये देखील आपण पहिले असावे कि नवग्रहांच्या मूर्तींमध्ये सूर्याला मध्य भागात ठेवले जाते. अन हे सर्व निश्चित करण्यात आलेला काळ काही हजारो वर्षां पूर्वीचा होता जेव्हा सर्वसामान्य लोकांना तत्वज्ञान आणि सिद्धांत हे गोष्टींस्वरूपात सांगितले जायचे. कदाचित म्हणूनच भारतीय इतिहास गोष्टींनी भरभरून वाहतो आहे.
आकाशात वृश्चिक तारका समूहात Antares नावाचा एक तारा आहे जो जवळपास ६०४ प्रकाशवर्षे अंतरावर स्थित असून साध्या डोळांनीहि सहज दिसू शकतो कारण रात्रीच्या आकाशात जास्त चमकणाऱ्या १५ तारका मध्ये Antares ची गणना होते. आधुनिक खगोलभौतिकीच्या अध्ययना नुसार हा तारा सुमारे 473.08 दशलक्ष किलोमीटर इतक्या प्रचंड व्यासाचा असूनत्याची व्याप्ती ७०० सूर्याचा एकच घास करू शकेल इतकी मोठी आहे. तसेच वयोमानाने सुद्धा हा तारा त्याच्या वार्धक्यात आहे अन कोणत्याही क्षणी त्याचा स्फोट होऊन तो विलुप्ती कडे वाटचाल करू शकेल. प्राचीन भारतीय ग्रंथात ह्या ताऱ्याचे नाव काय आहे माहित आहे, 'ज्येष्ठा'. ज्येष्ठा या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे कि सर्वात मोठा किंवा वृद्ध. हे नाव का सुचल असाव प्राचीन भारतीयांना? का त्यांनी एखादं दुसरं सामान्य नाव ह्या ताऱ्याला दिले नसावे? त्यांना त्या काळी अश्या काही गोष्टी कळल्या असाव्यात का ज्या आजच्या आधुनिक विज्ञानाचा वापर करून शोधल्या गेल्या आहेत? काहीतरी तर्क नक्कीच लावला गेला असावा असे वाटते?
आधुनिक खगोलशास्त्रा द्वारे ताऱ्यांच्या अंतराचे मोजमाप सुरु झाले अन आपण कोणताही तारा आपल्यापासून किती अंतरावर आहे हे ठरवू लागलो. Centaurus constellation (नरतुरंग तारकामंडळ) मधील अल्फा सेंटॉरी आणि प्रॉक्सिम सेंटॉरी ह्या द्वैती ताऱ्यांचे सूर्यापासून चे अंतर हे सर्वात कमी असल्याचे कळले. म्हणजेच सूर्याला सर्वात जवळचा तारा. अन ह्या ताऱ्याचे प्राचीन भारतातील ग्रंथात नमूद केलेलं नाव आहे 'मित्र', आपण सर्वात जवळच्या व्यक्तीलाच मित्र म्हणतो नाहीका? इतरही अनेक नावे उपलब्ध असताना या नावाचा विचार करताना
काहीतरी तर्क नक्कीच लावला गेला असावा असे वाटते?
सायणाचार्य नावाचे विजय नगर साम्राज्यातील विद्वान प्राचीन ऋग्वेदातील
'तरणिर्विश्वदर्शतो जयोतिष्क्र्दसि सूर्य | विश्वमा भासिरोचनम' (सूर्या तू तेजस्वी आणि सर्वात सुंदर कलावंत आहेस. सर्व तेजस्वी ज्योत प्रकाशित करतो) या चवथ्या सुक्तावर भाष्य करताना लिहितात कि, 'तथा च स्मर्यते योजनानां सहस्रे द्वे द्वे सते द्वे च योजने एकेन निमिषार्धेन क्रममन् ' म्हणजेच, सूर्य प्रकाश अर्ध्या निमिषामध्ये २,२०२ योजनांचा प्रवास करतो. एक निमिष म्हणजेच डोळ्याची पापणी लावण्या साठी लागणार कालावधी (आधुनिक पद्धतीने मोजल्यास ० .२११२ सेकंद) आणि विष्णू पुराणातील ६ व्या अध्यायातील संदर्भा प्रमाणे अंतर मापनाची संकल्पना पाहिल्यास, योजना म्हणजेच ९ .०९ मैल किंवा १४.६२८९४ किलोमीटर चे अंतर. अर्ध्या निमिषामध्ये २२०२ योजना म्हणजेच २,२०२ x ९ .०९ मैल प्रति ० .१०५६ सेकंद या प्रमाणे गणित केल्यास उत्तर मिळते ते १,८५,०९६.१६५ मैल प्रति सेकंद.
आणि आधुनिक भौतिकी च्या साहाय्याने मोजलेल्या प्रकाशाचा वेग १, ८६ ,२८२. ३९७ मैल प्रति सेकंद, दोन्ही संख्या उल्लेखनीय रित्या फारच जवळच्या दिसून येतात, कदाचित काही पाश्चिमात्यवादीना हा निव्वळ योगायोग वाटण्याची हि शक्यता नाकारता येत नाही. मात्र कोणत्याही आधाराविना किंवा पूर्व ज्ञानाशिवाय निश्चित पणे वेग सांगण्याचा प्रयत्न करून त्या विषयी सूत्र मांडणे सहसा शक्य नाही.
१६ व्या शतकातील गॅलीलियोच्या सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या बेनेडेट्टो कास्टेली यांनीसप्तर्षी तारकासमूहातील Mizar आणि Alcor या ताऱ्यांना दुर्बिणीद्वारे पाहिले आणि त्याला समजले की ती ताऱ्यांची द्वैती प्रणाली आहे: मिझर ए आणि मिझर बी. (Alcor ). 20 व्या शतकाच्या सुरूवातीस, स्पेक्ट्रोस्कोपीच्या साहाय्याने शास्त्रज्ञांनी दाखवून दिले की मिझर ए आणि बी दोन्ही द्वैती (बायनरी ) प्रणालीच आहेत. म्हणजेच हे दोन्ही तारे एकमेकांभोवती परिक्रमा करीत असतात. अंधाऱ्या रात्री निरखून पाहिल्यास ह्या दोन्ही ताऱ्यांना स्पष्टपणे पाहता येते.आज च्या प्रगत विज्ञानाद्वारे आपणाला आणखीन खोल जाऊन माहिती झाली आहे कि यातील Mizar सोबत आणखीन तीन बटू(खूप लहान) तारे आणि Alcor सोबत एक बटू तारा असून
त्यांना घेऊन हे दोन्ही मोठे तारे एकमेकांभोवती फिरत असतात. ह्या दोन्ही ताऱ्यांची भारतीय नावे आहेत अरुंधती आणि वसिष्ठ. कोणीही अरुंधती आणि वसिष्ठ या ताऱ्यांनी एकमेकान भोवतीची मारलेली फेरी पाहिलेली नाहीये कारण त्यांना एका फेरीसाठी लागणारा कालावधी हा ७,५०,००० वर्षांचा आहे.
तरीही अनेक भारतीय विवाह सोहळ्या मध्ये लग्नानंतर नवविवाहित जोडप्यांनी सप्तर्षी तारका मंडळातील अरुंधती आणि वसिष्ठ ह्या ताऱ्यांचे दर्शन घेण्याची प्राचीन प्रथा आहे. अरुंधती आणि वसिष्ठ यांचा एक आदर्श जोडपे म्हणून प्राचीन भारतीय साहित्यात उल्लेख येतो. हे सर्व निव्वळ योगायोग मानावं कि साशंकित वैज्ञानिक नजरेने का होईना आपल्या संस्कृतीत खोलवर जाऊन अभ्यास करावा?
सर आयझॅक न्यूटन ने १६८७ साली प्रिंकिपिया या ग्रंथात गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांत मांडला.
परंतु त्याच्या हि ५५० वर्षां पूर्वी भास्कराचार्य द्वारे लिहिल्या गेलेल्या सिद्धांत शिरोमणी ग्रंथातील काही पंक्ती पाहुयात,
सिद्धान्त शिरोमणी, गोलाध्याय भुवन्कोष ६
अर्थ- पृथ्वीकडे आकर्षित करण्याची शक्ती आहे म्हणूनच ती स्वतःकडे जड गोष्टी आकर्षित करते आणि आकर्षणामुळे गोष्टी जमिनीवर पडतात परंतु जेव्हा हि शक्ती एकसमान आकाशातील सर्व दिशांमधून एकमेकांना आकर्षित करतात तेव्हा हे सर्व कसे बरे पडतील? याचा अर्थ असा की ग्रह कोणतेही आधार न घेता आकाशातच राहतात कारण विविध ग्रहांच्या गुरुत्वीय शक्तींनी संतुलन राखला आहे.
त्या हि काळा पेक्षा जुने असलेले एक आणखीन उदाहरण पाहुयात.
शङ्कराचार्य भाष्य प्रश्नोपनिषद अध्यय ३ , श्लोक ८
एकंदरीत अर्थ असा आहे की पृथ्वीमध्ये जी हि अग्नी संज्ञा अभिमानी देवता प्रसिद्ध आहे ती पुरुषाच्या अपान वृत्तीला आकर्षण करून आपल्या वश मध्ये करून तिला खाली धरून ठेवते, पृथ्वीने जर पुरुषाच्या आपान वृत्तीला खाली ओढून धरली नसते तर शरीर जड भारी असल्यामुळे आकाशयुक्त अंतरिक्षात गेले असते.
महत्वाचे म्हणजेच हे भाष्य इसवी सनाच्या आठव्या शतकातील आहे, आधुनिक विज्ञान युगाच्या फार पूर्वी लिहिलेले.
वर नमूद केल्या प्रमाणे आणखीन ही अनेक उदाहरणे माझ्या वाचनात आलेली आली आहेत आहेत मात्र त्याविषयी लिहिणे प्रकर्षाने टाळतोय कारण निव्वळ विश्वास न ठेवता तार्किक आणि संभाव्यतेच्या दृष्टिकोनातून पारखून घेतल्या शिवाय येथे देणे चुकीचे ठरू शकेल कदाचित पुढील काही लेखांमध्ये त्याचा उल्लेख केला जाईल.
कालानुक्रमे निर्माण झालेल्या दूषित रूढींना बाजूला सारून भारतीय इतिहासात सापडणारे दुवे नक्कीच आपल्या विचारांना चालना देतील, अन हा ऐतिहासिक ठेवा उलगडून मानवजातीला अशक्य असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधता येतील.
हा अनमोल ठेवा इतिहासाने भारतीय उपखंडात प्रदान केला मात्र सहजतेने आपण त्याकडे दुर्लक्ष न करता थोड अध्ययन केल्यास उत्तम.
मुद्दा पाश्चिमात्य विरुद्ध पौर्वात्य असा नसून आपल्या प्राचीन आणि मानवोपोयोगी संकल्पना जाणून घेऊन त्याचा मानवकल्याणासाठी आधुनिक तंत्रज्ञान बरोबर उपयोग करण्याचं आहे. आणखीन इतरही शास्त्रांविषयी विविध संदर्भ प्राचीन भारतीय लिखाणांमध्ये आढळतात यात गौतम बुद्धांचे प्रगल्भ आत्मज्ञान असो, चरकाची संहिता, पतंजली ची योगसूत्रे, आर्यभट्टाचे आर्यभटीय अश्या अनेक आत्मज्ञानी व्यक्तिमत्त्वांच्या योगदानाची यादी न संपणारी आहे. आधुनिक प्रगतिशील तंत्रज्ञान आणि मानवीय मूल्ये आणि आत्मज्ञाना वर आधारित प्राचीन संकल्पना यांचा योग्य अभ्यास करून समन्वय साधल्यास मानवजातीचे कल्याणच साध्य होईल.
-तुषार महाडिक