सोबत शेअर केलेली खेळी हि बुद्धिबळाच्या पटावरील माझी सर्वोत्तम खेळी नाहीये, किंबहुना मी या खेळात पारंगत ही नाही.
विमानतळावर फ्लाईट ची वाट पाहत असताना सहजच खेळलेल्या १० मिनिटांच्या ह्या खेळीने जीवनाच्या एका महत्त्वाचा पैलूवर प्रकाश टाकला गेला म्हणून येथे शेअर करण्याची इच्छा झाली.
मोबाईल वर ऑनलाईन गेम सुरु झाला अन् सुरुवातीच्या काही परंपरागत चाली खेळल्या नंतर प्रतिस्पर्धा तर्फे आलेला संदेश माझ्या चॅट बॉक्स मध्ये झळकला, काही ऑनलाईन चेस साईट्स वर ही सुविधा उपलब्ध असते, त्याद्वारे प्रतिस्पर्धा सोबत खेळत असताना सोबत चॅटिंग हि करता येते, सहसा या फीचर चा वापर होत नाही कारण समोरील व्यक्ती ला बहुधा आपण ओळखत नसतो आणि तशी गरज ही नसते.
प्रतिस्पर्ध्या तर्फे आलेला मेसेज वाचल्यावर क्षणार्धात माझ्या मनात एक उत्स्फूर्त रागाची लहर उसळी, कारण मेसेज मध्ये प्रतिस्पर्ध्या ने स्वतः चा उल्लेख संपूर्ण जगाचा 'बाप' असा करत सांभाळून खेळण्याची ताकीद मला दिली होती, कांही क्षणातच भावनेच्या त्या उद्वेगाला दैवकृपेने अंतर्भूत असलेल्या आत्मसंयमी सवयी मुळे लगाम लागला अन त्या मेसेज वर काहीहि उत्तर न देण्याचा निर्णय घेतला मात्र पुढे खेळताना खेळ संपे पर्यंत अधून मधून त्या मेसेज विषयी विचार मनात येतच राहिलेत. मनाला जाणीवपूर्वक समजावून सांगण्यात मला काहीसं यश मिळालं कि ह्या ठिकाणी बुध्दीचा वापर करून निर्णय घ्याचा आहे अश्या वेळी बुध्दीला भावनेच्या उद्वेगाने भ्रष्ट करने अहितकारकच.
पुढचा खेळ म्हणजे माझ्या साठी फक्त जिंकणे किंवा हरण्या पुरता मर्यादित राहिला नव्हता, एक सजग जाणीव होऊन माझ्या साठी ती स्वतः ला पारखण्याची एक संधी होऊन बसली. शुल्लक किंमत असलेल्या गोष्टीला वैचारिक द्वंद्वात स्थान देऊन गेम वर परिणाम होऊद्यावा कि अस्खलित पणे निरर्थक भावनांना बाजूला सारून ध्यान फक्त खेळी आणि प्रतिखेळीं वर केंद्रित करावा, काही वेळातच मन स्थिरावल आणि निरर्थक रागाची तीव्रता दुर्लक्षित करण्या इतपत क्षीण झाली त्या मुळे पुढे तो खेळ मला जिंकताही आला. असे अनेक प्रसंग आपण रोजच्या जीवनात नक्कीच अनुभवत असतो, अगदी बस किंवा ट्रेन च्या गर्दी मधून प्रवास करताना असो कि कुटुंबातील व्यक्तींसोबत झालेला मतभेद असो अनेकदा भावनेचा उद्वेग उसळत असतो. प्रसंगी त्याला वाट करून देण्याची घाई आपल्या कडून होत असते अन काही वेळ निघून गेल्यावर जशी तीव्रता कमी होईल तसं समजूतदारपण मनात डोकावू लागतं.
मानवी मनाची भावभावनांशिवाय कल्पना करणं अशक्यच, नाकारात्मक विचार आणि भावना मनात डोकावणं हा मनाचा एक अविभाज्य पैलूच आहें ह्या भावनांचं हि आपला एक महत्व आहेच. राग, चिंता, भीती अश्या अनेक भावनांना जबाबदार असलेले ऍड्रेनॅलीन, कॉर्टिसॉल, नॉरएपिनेफ्रिन सारखे स्त्राव प्रत्येकाच्या मेंदूमध्ये असणारच. कदाचित ज्ञान प्राप्ती झालेला व्यक्तीस भावनांवर नियंत्र करणं शक्य असावं, मात्र माझ्या सारख्या सामान्य व्यक्ती साठी या भावना वर नियंत्रण आणण्या चा अवाजवी प्रयत्न करण्या पेक्षा त्या कश्या कमीत कमीत वेळेत नाहीश्या करता येतील यावर काम करणे योग्य राहील.
स्वानुभूतीने सापडलेले कांही उपाय येथे लिहीत आहें.
१. नकारात्मक भावना घालवण्या साठी त्यांच्याशी द्वंद्व करणे म्हणजे संपूर्ण निरर्थक प्रयत्न.
२. नकारात्मक विचारांना घालवण्या साठी तितक्याच तीव्रतेने अन जबरदस्तीने त्या भावनेच्या विरुद्ध भावनेचा विचार करावा. जसे राग आल्यास, प्रेम भावनेचा विचार करावा, तेही जबरदस्तीने जो पर्यंत मूळ भावनेची तीव्रता कमी होत नाही.
३. वादाच्या प्रसंगी उत्तर देण्या आधी किंवा प्रतिक्रिया देण्या आधी अनेकदा विचार करावा कि खरंच आज पासून २-३ वर्षानंतर हि हा घडलेला प्रसंग इतकाच महत्वाचा असणार आहें काय? खरंच मी प्रतिक्रिया देऊन वादात जिंकणं अत्यंत गरजेचं आहें काय?
४. निरर्थक आणि शुल्लक भांडणाला दुर्लक्षित करणे म्हणजे जिंकणे अन अश्या प्रसंगांना बळी पडून स्वतः च्या मेंदूला वर सांगितलेल्या सर्व स्रावां मध्ये बुडवून घेणे म्हणजे हरणं. हे मनात बिंबित करावं.
माझ्या लहानश्या अनुभवातून शिकलेल्या ह्या पद्धतींपेक्षा नक्कीच तुमच्या कडे आणखीन छान पद्धत असू शकते ज्याचा वापर करून आपण प्रसंग निभावून नेवूशकतो ज्या योगे कधीही भरून न येणारे नुकसान टाळता येऊ शकते. जगप्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट ब्रूस ली चं एक वाक्य नेहमी ध्यानी राहूदे
"Learn to discipline your emotions, if you don't, your opponent will use it against you".
-Tushar Milind Mahadik.
No comments:
Post a Comment